Maharashtra First Cm: जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्र्याची चर्चा होते, त्यावेळी सुप्रिया सुळे यांच नाव आघाडीवर असतो. आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असून, या चर्चेला शिवसेनकडून उत्तरही देण्यात आलं आहे. पुढील २५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील त्यामुळे सुप्रिया सुळे यांना २५ वर्षांनंतर मुख्यमंत्री होण्यासाठी माझ्या शुभेच्छा असा खोचक टोला शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. 


सुप्रिया सुळे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना 'पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार' असं साकडं त्यांनी तुळजाभवनी देवीचे दर्शन घेतांना घातले. यावेळी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यास आवडेल का? असा प्रश्न काही पत्रकारांनी सुळे यांना विचारला. त्याला उत्तर देतांना 'महाराष्ट्राची जनता ही राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवेल, मी ठरवू शकत नाही' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनतर पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा महिला मुख्यमंत्री पदासाठी होऊ लागली. 


काय म्हणाले सत्तार... 


सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असल्याचा प्रश्नाला उत्तर देतांना सत्तार म्हणाले की, महिला मुख्यमंत्री करायच्याच असेल तर मी यापूर्वीच नाव सुचवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना महिला मुख्यमंत्री करावे असं सत्तार म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे 25 वर्षे मुख्यमंत्री राहावे यासाठी यापूर्वीच मंदिरात पूजा झाली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा 25 वर्षांनंतर नंबर लागावा अशीच आमची देवाला प्रार्थना राहील,असं सत्तार म्हणाले. 


सुळेंच्या दौऱ्यात नाराजीनाट्य 


सुप्रिया सुळे सोमवारी उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांकडून सुळे यांचा ताफा अडवण्यात आला. सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना स्थान न दिल्याचा आरोप यावेळी या कार्यकर्त्यांनी केला. त्यांनतर सुप्रिया सुळे यांनी गाडी थांबवून त्यांचे म्हणणं आयकून घेतलं. त्यांना आपल्या गाडीत बसवून स्वतः दुसऱ्या गाडीत बसून पुढील कार्यक्रमासाठी निघाल्या.