CM Eknath Shinde PC : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित शिंदे सरकारनं (Maharashtra New Government) राज्यातील जनतेला पहिलं मोठं गिफ्ट दिलं आहे. गगनाला भिडलेल्या इंधनांच्या दरांमुळे सर्वसामान्यांना शिंदे सरकारनं काहीसा दिलासा दिला आहे. आज शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले.
इंधन दरवाढीनं मेटाकुटीला आलेल्या जनतेला शिंदे सरकारनं दिलासा दिला आहे.. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इंधनावरील करकपातीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार पेट्रोलवरील कर 5 रुपयांनी तर डिझेलवरील कर 3 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. अशातच नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं ठाकरे सरकारनं रद्द केलेल्या काही निर्णय पुन्हा नव्यानं घेतले आहेत.
ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा मुख्यमंत्री शिंदेंकडून पुनरावलोकन करण्यात आलं. मागील 6 महिन्यांतील निर्णयाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ठाकरे सरकारनं रद्द केलेले तब्बल 4 निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा घेतले आहेत.
ठाकरे सरकारनं बदललेले निर्णय 'पुन्हा' आले
- नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीनं होणार
- ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवडणूक थेट पद्धतीनं
- बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार
- आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांसाठी सन्मान योजना पुन्हा सुरु
बुलेट ट्रेनसंबंधी मुख्यमंत्र्यांनी सर्व परवानग्या दिल्या : उपमुख्यमंत्री
बराच काळ रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पालाही शिंदे सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनसंबंधी मुख्यमंत्र्यांनी सर्व परवानग्या दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा वेग धरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :