मुंबई: राज्यात येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर (School Closed Today) करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. राज्यातील इतर भागातील परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच दहावी आणि बारावीचे उद्या होणारे पुरवणी पेपरही पुढे ढकलण्यात आली आहे.


राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने 10वी व 12वीच्या उद्या होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 10वी चे पुढे ढकलण्यात आलेले पेपर 2 ऑगस्ट रोजी होतील तर 12 वीचे पेपर 11 ऑगस्ट रोजी होतील. 


गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गुरूवारी या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 


परिस्थिती पाहून निर्णय घ्या, शिक्षण उपसंचालकांचे आदेश


राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. 


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकक्षेतील परिस्थिती विचारात घेता आपत्तीच्या पूर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा तसेच त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकरण यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.


पालघरमध्ये एनडीआरएफची टीम तैनात 


पालघर जिल्ह्यासाठी मंगळवारपासून दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या त्या अंदाजानुसार रात्रीपासूनच पावसानं पालघर जिल्ह्यात जोर पकडला. त्यामुळं प्रशासनाकडून पालघर जिल्ह्यातल्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याचवेळी पालघर जिल्ह्यासाठी एनडीआरएफ जवानांची एक तुकडी खबरदारीची उपाययोजना म्हणून विरारमध्ये तैनात करण्यात आली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नायगाव, ससूनवघर आणि घोडबंदर भागात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली. केळवे रोड स्थानर परिसरात पुराचं पाणी साचून रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.


दरम्यान, राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


ही बातमी वाचा: