Maharashtra:राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसाने राज्यभरात दाणादाण उडाली आहे. मान्सूनचा पावसाने अनेक भागात अतिवृष्टी झाली .वर्षभराची सरासरी एकाच दिवसात भरून निघाली . राज्यात 24 तारखेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय असून 12 जण जखमी झाले आहेत . पाण्यात बुडून, वीज कोसळून, भिंत पडून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे . याशिवाय अनेक जनावरेही दगावली आहेत .
राज्यभरात पावसामुळे 21 जणांचा मृत्यू
गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे .या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली . भिंती खचल्या .पुरामध्ये लोक वाहून गेल्याचे दिसून आले . राज्यभरात पावसामुळे एकूण 21 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण वेगवेगळ्या कारणांनी जखमी आहेत .
जालन्यात पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला असून काल नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तीन जणींचा मृत्यू झाला .यवतमाळ मध्ये पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झालाय .मुंबई शहर व उपनगरात झाड पडल्याने दोन जण दगावले . अहिल्यानगरात भिंत अंगावर पडून दोन मृत्यू आहेत . अनेक जिल्ह्यांमध्ये वीज पडल्याने मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे .भंडारा चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जण अंगावर वीज पडल्याने दगावल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
मान्सूनची प्रगती वेगात
सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे .हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस कमाल व किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे पावसाचा जोरही ओसरणार असल्याचा सांगण्यात येतंय . दरम्यान मान्सून ने राज्यात जोरदार प्रवेश करत मुंबई पुणे सोलापूर सह संपूर्ण राज्य व्यापले आहे . नैऋत्य मान्सून सोमवारी एकाच दिवशी मुंबई, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला .येत्या दोन दिवसात मान्सूनचा पाऊस काहीशी उसंत घेणार आहे .
10 दिवसात पावसाचे 42 बळी
राज्यभरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 19 मे पासून राज्यात अनेक भागात जीवघेणा पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून मान्सूनने कहर केला असून त्यापूर्वी पूर्व मौसमी पावसाने राज्याला झोडपले. काल एकाच दिवसात राज्यात पावसाचे दहा बळी गेले.