Maharashtra Monsoon Session : राज्यात सध्या पावसाचा हाहाकार (Maharashtra Rain Updates) असून, राज्यातील अनेक भागात याचा परिणाम पहायला मिळत आहे..मुंबईसह कोकणात पडणाऱ्या या मुसळधार पावसाचा फटका पावसाळी अधिवेशनाला देखील बसणार की काय अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र अधिवेशन ठरलेल्या तारखेला संपणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पण अधिवेशन लवकर संपवा ही चर्चा अचानक सुरू झाली होती.
राज्याचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू झाले असून, अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. पहिल्याच दिवसांपासून शांततेत सुरू असलेले हे अधिवेशन लवकर गुंडाळले जाईल अशी चर्चा गुरुवारी सकाळपासूनच सुरू झाली होती. काही आमदारांनी तशी मागणीही केली होती. भाजप आमदार संजय कूटे यांनी तर आपण तशी विनंती सभागृहात करणार असल्याचे माध्यमांना सांगून टाकले.
अधिवेशन लवकर संपवण्याची चर्चा का?
राज्यातील अनेक भागात सध्या पूरस्थिती आहे. ज्या भागात पूरस्थिती आहे त्या भागातले आमदार, पालकमंत्री अधिवेशनात व्यस्त आहेत. अधिवेशन सुरू असल्याने अधिकारीही अधिवेशनात व्यस्त आहेत. अधिवेशनामुळे इतर यंत्रणावर ताण पडत असल्याने अधिवेशन संपवून ही यंत्रणा पूरस्थितीसाठी कामाला लावावी अशी आमदारांची मागणी होती.
दरम्यान एकिकडे अधिवेशन लवकर संपवण्याची मागणी होत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मात्र सरकारवर टीका करत अधिवेशन न संपवण्याची मागणी केली होती.
मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.
सकाळपासून सुरू असलेल्या चर्चेला कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पूर्णविराम मिळाला. दुपारी तीन वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत अधिवेशन 4 ऑगस्ट रोजी संपणार असल्याची माहिती समोर आली. सोमवार आणि मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनाला सुट्टी जाहीर करण्यात आली. शनिवार आणि रविवारी विधिमंडळाचे कामकाज बंद असते. आता, सोमवार आणि मंगळवारदेखील सुट्टी देण्यात आली. राज्यातील पावसाची परिस्थिती बघता सर्व आमदारांना शनिवार ते मंगळवार आपल्या मतदारसंघात या निमित्ताने जात येणार आहे.