Maharashtra MLC Eletion Results :  राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन जागांचा निकाल जाहीर झाला असून इतर तीन जागांवर मतमोजणी सुरू आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली असून त्यांना नागपूरमध्ये मविआ समर्थित उमेदवाराकडून पराभव स्विकारावा लागला आहे. तर, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ, अमरावती पदवीधर, नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी भाजप पिछाडीवर आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर आहेत. 


फडणवीस, बावनकुळे यांना धक्का 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना गृह जिल्ह्यात धक्का बसला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव झाला आहे.  महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. भाजप पुरस्कृत नागो गाणार यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 34 हजार 360 पत्रिकांपैकी 28 हजार मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतामधील एक हजार 99 मते अवैध ठरली तर 26 हजार 901 मते वैध होती. त्यापैकी, जवळपास 55 टक्के मते अडबोले यांना मिळाली आहेत. 


अमरावती पदवीधर मतदारसंघात चित्र काय?


अमरावती पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले उमेदवार धीरज लिंगाडे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दोन टर्म पासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ रणजित पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत. दुसऱ्या फेरी अखेर लिंगाडे हे 1600 मतांनी आघाडीवर आहेत. 


धीरज लिंगाडे बुलढाणा जिल्हाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते तर अमरावती पदवीधर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटल्याने काँग्रेस पक्षाने धीरज लिंगाडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी दिली. 


मराठवाड्यात विक्रम काळे विजयाच्या चौकारासाठी सज्ज


औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजय मिळणार असल्याचे चित्र आहे. मतमोजणीच्या पहिल्या पसंतीचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता निकाल हाती येण्यासाठी रात्री 10 वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण 20 हजार 78 मते पडली आहे. तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13 हजार 489 मते पडली आहे. तर, शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 543 मते पडली आहे. यावेळी एकूण 2 हजार 485 मते बाद झाली. 


नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर 


नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे  यांना 15 हजार 784 मते मिळाली. तर, मविआ समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 मते मिळाली. पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे यांना सत्यजीत तांबे याना 7 हजार 922 मतांची आघाडी मिळाली आहे. 


कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी


कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बळीराम पाटील यांचा पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 648 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 9768 मते मिळाली आहेत. एकूण 3002 मते अवैध ठरली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.