अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपला धक्का देत वाशिम येथील रहिवासी अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईक यांनी बाजी मारली. किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला. त्यामुळे अमरावती विभागात बलाढ्य पक्षाला धक्का देत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला.
अखेरच्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांची मते 15 हजार 606 वर पोहोचून कोटा पूर्ण झाला. या प्रक्रियेला निवडणूक आयोगाने मान्यता आली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पियुष सिंह यांनी किरण रामराव सरनाईक हे विजयी झाल्याची घोषणा केली आणि विजयाचे प्रमाणपत्र त्यांना दिलं.
अंतिम टप्प्यातील मतमोजणीवर शेखर भोयर यांचा आक्षेप
त्याआधी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी 25व्या फेरीच्या मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे तसेच फेर मतमोजणीची मागणी केली आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भोयर यांची मागणी फेटाळत पुन्हा मतमोजणी होणार नसल्याचं सांगितलं. शेखर भोयर यांच्या म्हणण्यानुसार भोयर यांना 25व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा 9 मतं जास्त होती. त्यानंतर सुरु झालेल्या पुढील फेरीच्या मतमोजणी आधी भोयर यांना देशपांडे पेक्षा 171 मतांनी पिछाडीवर दाखवण्यात आले. याबाबत शेखर भोयर यांनी आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याला नकार दिला. मात्र याविषयी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं शेखर भोयर यांनी सांगितलं.
अमरावती विधान परिषद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे, अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी शेवटपर्यंत लढत दिली, मात्र यामध्ये भाजपाचे उमेदवार नितीन धांडे यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे या सर्व निकालावरुन अमरावती विभागात भाजप, महाविकास आघाडीच्या नेत्यांना एका अपक्ष उमेदवाराने लढत दिल्याने त्यांना याबाबत चिंतन करावे लागेल.
मी शैक्षणिक विभागात असलेल्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी दिली.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचपैकी चार जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना यश मिळालं. नागपूर आणि पुणे हे भाजपचे गड भेदण्यात महाविकास आघाडीला यश आलं. तर औरंगाबादमध्येही सहज विजय मिळवला.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विजयी उमेदवार
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण
पुणे पदवीधर मतदारसंघ - अरुण लाड
पुणे शिक्षक मतदारसंघ - जयंत आसगांवकर
नागपूर पदवीधर मतदारसंघ - अभिजीत वंजारी
अमरावती शिक्षक मतदारसंघ - किरण सरनाईक
Amravati MLC Election Results | अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी