मुंबई : भाजपकडून माझ्या घरात फक्त मला आणि माझ्या सुनेलाच उमेदवारी दिली आहे. भाजपने विधानसभेला माझ्या मुलीला दिलेली उमेदवारी मी मागितलेली नव्हती. वारंवार सांगितलं मुलीला तिकीट देऊ नका. यांनी मुलीला जबदस्तीने तिकीट दिलं, म्हणजे उपकार केले नाहीत. पक्षाने आम्हाला दिलं हे मान्यच आहे, पण पक्षासाठी आम्ही काहीच केलं नाही का? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विचारला. सोबतच चंद्रकांत पाटील यांचं भाजपमध्ये शून्य योगदान आहे. त्यांचं मोठं योगदान विद्यार्थी परिषदेत आहे. तरीही त्यांना भाजपने स्वीकारलंच ना, असंही एकनाथ खडसे म्हणाले.


"नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी भाजपला मोठं करण्यात योगदान आहेत. मात्र अनेकांनी काही अपेक्षा न करता काम केलं. तसं नाथाभाऊंना पक्षाकडून खूप काही मिळालं आहे. अनेकांची तिकीटं कापून त्यांनी स्वत:च्या घरात नेली त्यावेळी त्यांनी खंजीर खुपसला नाही का?" असं चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. त्यावर एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं.


...तरीही भाजपने चंद्रकांत दादांना स्वीकारलंच ना!
एकनाथ खडसे म्हणाले की, "एकासाठी एक निकष आणि दुसऱ्यासाठी दुसरा हे मला पटत नाही. चंद्रकांत पाटलांचा आदर करतो. त्यांनाच विचारायचं आहे की, उभा महाराष्ट्र पिंजून काढला, तळागाळात पोहोचलो, आंदोलनं केली. 40 वर्ष पक्षात काम करत होतो, तेव्हा चंद्रकांतदादा भाजपमध्ये होते का? ते विद्यार्थी परिषदेत होते. तरीही विद्यार्थी परिषद ही परिवारातली संघटना आहे म्हणून अध्यक्ष म्हणून मान्यता मिळाली की नाही? त्यांचं भाजपमध्ये शून्य योगदान आहे. त्यांचं मोठं योगदान विद्यार्थी परिषदेत आहे. तरीही त्यांना भाजपने स्वीकारलंच ना."


शिव्याशाप देणारे आमदारकीसाठी पात्र
गोपीचंद पडळकर यांना कोणत्या मेरिटवर उमेदवारी दिली असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. "राज्यसभेसाठी माझ्यासाठी शिफारस केली होती. त्यावेळी तिकीट मिळालं नाही तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेसाठी तिकीट देण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी मी तिकीट मागितलं नव्हतं. पक्षाने मला अनेक पदं दिली त्याचं समाधान आहे. परंतु पडळकरांना कोणत्या मेरिटवर तिकीट दिलं? भाजपला शिव्याशाप देणारे आमदारकीसाठी पात्र समजले जातात. मोहिते पाटलांचं आय़ुष्य राष्ट्रवादीत गेलं. मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं, विधानपरिषदेचं तिकीट कापलं."


चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
दरम्यान त्याआधी चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले की, "खडसे यांच्याबद्दल आपण फक्त अंदाज व्यक्त करु शकतो. खडसे यांना सात ते आठ वेळा संधी दिली. खडसे यांना पक्षाने खूप काही दिलंय. रावेरचे सीटिंग खासदार हरिभाऊ जावळे यांचं घोषित केलेलं नाव मागे घेऊन खडसे यांच्या सुनेला तिकीट दिलं. त्यांची मुलगी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची चेअरमन आहे. त्यांच्या पत्नी महानंदाच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या मुलाला देखील पक्षानं तिकीट दिलं होतं. यामुळे केंद्राने असा विचार केला असेल की किती द्यायचं यांना? आणि कितीही दिलं तरी ते जाहीरपणे बोलतातच. पक्षाची कार्यपद्धती पाळत नाहीत. त्यामुळे खडसे यांनी पक्षात एक वरिष्ठ कार्यकर्ता, एक मार्गदर्शक म्हणून काम करावं, असा विचार केला असावा. आम्ही तर त्यांना तिकीट द्यावं यासाठी प्रयत्न करत होतो."


"इतक्या मोठ्या नेत्याने पक्षाचे वाभाडे काढताना काय खरं आणि काय खोटं आहे, हे तरी पाहायला हवं," असं देखील पाटील म्हणाले. "आम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आहेत, ते उपरे नाहीत,ठ असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. "भाजप आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंड्यामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशीच कार्यपद्धती हा आमच्या अजेंड्याचा भाग आहे. घरातली भांडणं बाहेर जाऊ न देणं, दुसऱ्याला मोठं करणं फक्त घरातल्यांनाच मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही," असं देखील पाटील म्हणाले.


विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीनंतर आरोप-प्रत्यारोप
या सगळ्या आरोप प्रत्यारोपांची सुरुवात विधानपरिषद निवडणुकीसाठी दिग्गजांना तिकीट नाकारल्यानंतर झाली. विधानपरिषदेला तिकीट नाकारल्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला होता. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले होते की, मार्चमध्येच आमच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, तर मग ही फसवणूक केली? स्वतःकडे ज्यावेळस अधिकार येतात तेव्हा संघटनेला विश्वासात न घेता, मी पक्ष चालवतो, अशी भावना निर्माण होते. तेव्हा पक्षाची अशी वाताहत होते. आज भाजपाचं जे चित्र आहे, ते सामूहिक नाही. संघटित नाही. एकमेकांशी चर्चा करुन निर्णय घेतले जात नाही. एखाद्यावेळी तर ते देखाव्यापुरते दाखवले जातात, असं खडसे म्हणाले होते.


त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज एकनाथ खडसे यांच्या आरोपांना उत्तर दिलं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नाथाभाऊंना पक्षाकडून खूप काही मिळालं आहे. त्यांनी आजवर अनेकांना डावलून घरात तिकिटं दिली, त्यावेळी त्यांनी त्या कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? असा सवाल देखील पाटील यांनी केला आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा उत्तर दिलं.


Eknath Khadse | भाजपविरोधात गरळ ओकणार्‍या लोकांना आमदारकी का? : एकनाथ खडसे