मुंबई : मुख्यमंत्री फडणवीसांकडे असलेल्या गृहविभागाच्या एका निर्णयानं सध्या अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याच शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्याचं झालं असं की अपुऱ्या पोलिस बळामुळे अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यात माजी मंत्री आणि आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. पण ही सुरक्षा कपात शिंदेंच्या आमदारांना रुचलेली नाही अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
गृहखात्याच्या निर्णयामुळे शिंदे नाराज?
राज्याच्या गृहखात्यानं लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पण गृहखात्याच्या या निर्णयावरुन महायुतीतच संघर्षाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे. कारण सुरक्षेत कपात करण्यात आलेले सर्वाधिक आमदार हे शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत.
व्हीआयपींच्या सुरक्षेत नेमके कोणते बदल करण्यात आलेत यावर एक नजर टाकूयात,
- सर्वपक्षीय माजी आमदार आणि माजी खासदारांची सुरक्षा काढण्यात आली आहे.
- सर्वपक्षीय विद्यमान आमदारांची वाय प्लस सुरक्षा काढून केवळ एक कॉन्स्टेबल देण्यात आला आहे.
- माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची झेड प्लस सुरक्षा कायम आहे.
- शरद पवार, उद्धव ठाकरे यांची झेड प्लस सुरक्षा कायम आहे.
- राज ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, श्रीकांत शिंदे यांची वाय प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
शिंदेंचे आमदार नाराज
यात भाजप आणि राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असला तरी संतापाचा भडका मात्र शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांचा उडाल्याचं दिसतंय. कारण सुरक्षाकपातीचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या आमदारांनाच बसला आहे. माजी मंत्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, सुहास कांदे, अभिजीत अडसुळ आणि प्रकाश सुर्वे यांच्यासह 20 आमदारांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे शिंदेंचे आमदार नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे...
या सुरक्षा कपातीवरून सुरू असलेल्या नाट्यावर संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलंन हल्लाबोल केला. त्यांनी या राज्यात वाय झेड करून टाकली आहे, हे वेड्यांचे सरकार आहे. हे मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयात गोंधळ आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
त्यांना नितेश राणेंनी त्याच भाषेत उत्तर दिलंय. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्यांची सुरक्षा काढली तर त्यांनी लोक त्यांना अंडी, टमाटे मारतील.
गृहखात्याच्या निर्णयाचं स्वागत
राज्यात पोलिसांची संख्या पुरेशी नाही. पोलिस बळाच्या कमतरतेचा मुद्दा अनेकदा समोर आला. त्यामुळे अनेक वेळा पोलिसांना 12 ते 14 तास ड्युटी करावी लागते. वेळप्रसंगी ते 24 तास ऑन ड्युटी असतात. मात्र काही नेतेमंडळी आपल्या सभोवती पोलिसांचा गोतावळा असणं ही रुबाबाची गोष्ट समजतात. त्यामुळे गृह खात्याच्या या निर्णयाचं एकीकडे स्वागतही केलं जात आहे.
ही बातमी वाचा: