Shirdi News : शिर्डीत साई दर्शनासाठी (Shirdi Sai Baba Darshan) सक्तीचा असलेला बायोमेट्रिक पास आजपासून बंद करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळालाय. भाविकांची होणारी ससेहोलपट आता थांबली असून वेळेची देखील आता बचत होणार आहे. यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घोषणा करूनही सकाळी पास सक्ती सुरूच होती, मात्र एबीपी माझाने वृत्त दाखवताच पास मुक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलीय.
...आणि दर्शनपास काउंटर बंद करण्यात आले.
शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी बायोमेट्रिक अर्थात ऑफलाईन पास सक्तीचा असल्याने दोन वेळा रांगेत उभ राहावे लागत होते. पास घेताना वृद्ध , लहान मुले यांचे मोठे हाल होत होेते. साईबाबा संस्थानने भाविकांना दिलासा देण्यासाठी बायोमेट्रिक पासची अट हटवल्याने भाविकांचा मनस्ताप कमी झाला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान आज पासुन दर्शनपास बंदचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देखील आज सकाळी विना पास सोडत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. प्रशासनाचा असमन्वय त्यामुळे समोर आलाय. एबीपी माझा च्या बातमीनंतर प्रशासन जागे झाले आणि दर्शनपास काउंटर बंद करण्यात आले.
रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार
साईबाबांच्या दर्शनासाठी बायोमेट्रिक दर्शन पास बंद करण्याचा निर्णय साई संस्थानचे अध्यक्ष व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आला होता. कोरोना महामारीची बंदी हटविण्यात आल्याने यावेळी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी 95 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील 21 लाख रुपये ग्रामस्थांच्या प्रवास समितीच्या कार्यक्रमासाठी दिले जातील. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे भक्तमंडळी अस्वस्थ होते. शिर्डीतील अभिषेक आणि सत्यनारायण विधी कोरोना निर्बंधामुळे बंद करण्यात आली होती.
अभिषेक, सत्यनारायण विधी सुरू
1 एप्रिलपासून अभिषेक, सत्यनारायण विधी सुरू होणार आहेत. मंदिर परिसरात लावण्यात आलेले बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. यासोबतच भक्त निवाससमोरील बाग आणि ग्रामदेवतेचे दर्शनही सुरू होणार आहे. शिर्डीतून जाणाऱ्या अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला साई संस्थान महाद्वार बांधणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. शिर्डीत समाजकंटकांकडून भाविकांचा छळ होत असल्याची तक्रार संस्थेला प्राप्त झाली असून, ती सोडवण्यासाठी संस्था पोलिसांची मदत घेणार आहे.