Maharashtra Breaking News LIVE Updates : ज्यांना घरातून बाहेर काढल त्यांच्यावर काय बोलणार, अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंना टोला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बीड जिल्ह्यातील हजारो हेक्टर उस शेतात उभा आहे. साखर कारखाने ऊस घेऊन जात नाहीत. त्यामुळे ऊसाचा फड पेटवून देऊन शेतकऱ्याने कालच आत्महत्या केली होती. त्यानंतर आज आणखी एका शेतकऱ्याने कारखाना ऊस घेऊन जात नाही म्हणून उसाच्या फडाला आग लागून पेटवून दिला आहे.
रानिल विक्रमसिंघे आता श्रीलेंकेचे नवे पंतप्रधान असतील. महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
आम्ही कोणालाही घाबरणार नाही, ज्यांची लायकी नाही त्यांना आम्ही का उत्तर द्यायचं? असा प्रश्न उपस्थित करत अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
मी कुणालाही उत्तर देण्यासाठी आलो नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलं आहे त्यांच्यावर काय बोलणार असा टोला एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन औवेसी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. आम्ही कुणालाही घाबरणारे नाही असंही ते म्हणाले.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावांमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेल्या कमानीला नाव देण्यावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली, यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. जमावाने केलेल्या दगडफेकी मध्ये 4 ते 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून या दगडफेकीत पोलिसांची व्हॅन, जीपसह अग्निशमन दलाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी गावच्या सरपंच आणि उपसरपंचासह 20 ते 25 जणांना अटक केली आहे. दरम्यान गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी अनधिकृत पणे उभारलेला शिवरायांचा पुतळा हटवला असून ती कमान देखील काढण्यात येणार आहे.
बदलापूर बारवी धरण परिसरातील कारंद गावात या वानराने मानवी वस्तीत धुमाकूळ घातला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले, मात्र यश येत नव्हते. अखेर बदलापूर रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने दीड ते दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला जेरबंद केले. सध्या वन विभागाच्या ताब्यात या वानराला देण्यात आले असून त्याला सुखरूप जंगलात सोडले जाणार आहे.
उल्हासनगर महापालिकेतील बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी आज ऑन ड्युटी एका वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले होते. त्यामुळे महापालिका मुख्यालयात आज अनेक विभागात खुर्च्या रिकाम्या असल्याने शुकशुकाट पसरल्याचे पहायला मिळाले. अनेक नागरिक महापालिकेत आपल्यावर त्यांनी ही परिस्थिती पाहिल्यावर त्यांना आज महापालिकेला सुट्टी आहे का? असा प्रश्न पडला. यातील अनेक जण विविध कामासाठी,तसेच तक्रारी आणि अर्ज घेऊन आले होते,त्यांना पुन्हा माघारी परतावे लागले. मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे मंत्रालयात एका महत्वपूर्ण बैठकीला गेले होते, तर उर्वरित जवळपास ८० ते ९० टक्के अधिकारी आणि कर्मचारी उल्हासनगर मधील टाऊन हॉल मध्ये वाढदिवसाच्या पार्टीत मग्न होते.
एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी खासदार इम्तियाज जलील आणि वारीस पठाण हेदेखील उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे पी. चिदंबरम यांची मुदत संपत आहे. तर भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. 31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून निवडणूक लागली तर 10 जून रोजी मतदान होईल.
Pandharpur : Abp इम्पॅक्ट, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी पुरातत्व विभागाचा अहवाल आला आहे. आज मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूजेच्यावेळी दूध , दही , मध साखर वापरावर मर्यादा आणून क्षार मुक्त RO पाण्याचा वापर होणार. गाभारा आणि चौखांबीमध्ये भाविकांच्या श्वसनाचे ह्युमीडिटी वाढत असल्याने गरम हवा बाहेर जाण्यासाठी अजून प्रयत्न करणे. रुक्मिणीच्या पायाबाबत का कळवले नाही याची चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करणार आहे. पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार रुक्मिणीच्या पायाला वज्रलेप करणार आहे. मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील 14 मे ला नांदेड दौऱ्यावर, खलिस्तानाचे नांदेड कनेक्शन समोरं आल्यानंतर दौऱ्याला विशेष महत्त्व
एक दिवशीय दौऱ्यात गृहमंत्री नांदेड पोलिसाच्या कामकाजाचा आढावा घेणार
अलिकडे सापडलेल्या बेकायदेशीर शस्त्र, खलिस्तानींचे नांदेड कनेक्शन समोर आले होते. याची ही घेणार माहिती
आटपाडी ग्रामपंचायत आता नगरपंचायत होणार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आज आटपाडीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना जमिनासाठी पोलीस स्टेशनला हजर रहावे लागणार
मुंबई बँक प्रकरणी हायकोर्टाने दरेकर यांना नुकताच दिलासा दिला होता
त्यानंतर आता त्यांना माता रमाबाई पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहून जमीन घ्यावा लागणार आहे
उद्या प्रवीण दरेकर यांनी माता रमाबाई पोलीस स्टेशनला जामिनासाठी यावे अशी नोटीस पोलिसांनी दिलीय
चौथ्या दिवशी डी-गँगशी संबंधित सदस्य चौकशीसाठी NIA मुख्यालयात येऊ लागले.
आज सुमारे तीन ते चार जण कार्यालयात चौकशीसाठी पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले.
एनआयएने सोमवारी मुंबई आणि उपनगरातील 29 ठिकाणी छापे टाकले.
एका महिलेसह 21 वेगवेगळ्या लोकांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले.
हे सर्व एकतर डी-गँग, त्यांचे नातेवाईक किंवा साक्षीदार आहेत आणि 93 बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष आहेत.
काल ईडी आणि आयबी देखील या प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएच्या मुख्य कार्यालयात आले होते.
Pune News : मला विश्वास आहे की छत्रपती च्या घराण्यातील एकमेव माणूस म्हणून मी समाजहितासाठी कामं करत आहे. मी आजपासून कुठल्याही पक्षात नाही. सगळ्यांना संघटित करण्यासाठी जिथे अन्याय होतो तिथे लढा देण्यासाठी मी आणि आम्ही सर्व एक संघटना स्थापित करणार आहोत. या संघटनेचे नाव असेल स्वराज्य : संभाजीराजे छत्रपती
Pune News : "जनसेवा करायची असेल तर राजसत्ता हवी. भाजप 3, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 1, शिवसेना 1 असं राज्यसभेचे आधीचं समीकरण होतं. आता हेच समीकरण भाजप 2 आणि इतर 1 असं आहे. यंदा राज्यसभेची निवडणूक मी लढवणार आहे. यावेळी मी अपक्ष म्हणून लढणार आहे," असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.
'छत्रपती घराण्यावर जनतेचे किती प्रेम आहे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला राज्यसभेचा राष्ट्रपती नियुक्त सभासद होण्याची विनंती केली. 2016 मध्ये मी राज्यसभेचा खासदार झालो. त्याबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो', संभाजीराजे छत्रपती.
संभाजीराजे छत्रपती हे आज राजकीय दिशा स्पष्ट करणार
Raigad News : रायगड जिल्ह्यातील उरणच्या समुद्रकिनारी स्फोटकं सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्फोटकांच्या 10 ते 12 कांड्या सापडल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. नवी मुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलं असून मोरा पोलीस, एसीपी कार्यालयाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान माणकेश्वर समुद्रकिनारी ग्रामस्थांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
माॅन्सून वेळेआधी दाखल होणार, भारतीय हवामान विभागाचा पुढील ४ आठवड्यांचा अंदाज जाहीर
अंदमानच्या समुद्रावर १३ ते १९ मे दरम्यान पावसाचा अंदाज
अंदमानात मान्सून २२ मे पर्यंत दाखल होत असतो, मात्र यावेळी त्याआधीच दाखल होणार
२० ते २६ मे दरम्यान मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज, तर तळ कोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाकडून मान्सून आॅन-सेटची तारीख १५ मे रोजी जाहीर होणार
मुंबई विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभाला सुरवात, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कार्यक्रमाला उपस्थित
या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तबलावादक पद्मभूषण झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ ( एल एल डी )व प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ( डी. लीट.) मानद पदवी देण्यात येत आहेया कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोशारी , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू सुहास पेडणेकर , प्र कुलगुरू, कुलसचिव, सिनेट पदाधिकारी उपस्थित आहेत
उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, अपघातात मृत्यू झालेले सर्वजण पुण्याचे रहिवाशी
पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वर आज सकाळी 8 वाजता पार्डी म गावाजवळ असलेल्या गुरुद्वारा येथे-एसटी महामंडळ बस आणि दोन ट्रकचा समोरासमोर तिहेरी अपघात होऊन 10 ते 12 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या शेतात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे. तर ऊस गाळप हंगाम संपूनही कारखाना ऊस घेऊन जात नसल्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपला ऊस पेटवून द्यावा लागत आहे. आज सकाळी अशाच एका शेतकऱ्याने ऊस पेटवून दिल्याने महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट होते, या धुराच्या लोटामुळे वाहन चालकांना समोरचे दिसत नसल्यामुळे वाहन चालवणे अवघड झाले होते. त्यात नांदेडकडून हदगावकडे जाणारी एसटी महामंडळची बस MH-20 BL-1707 चालकास धुराच्या लोटामुळे वारंगाकडून नांदेड येणारे RJ-32 GB7101 व UP50 BT 7641 हे दोन ट्रक दिसले नाही, त्यामुळे सदर ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय. ज्यामध्ये 10 ते 12 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त महामंडळ बसचा चालक व ट्रक चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच अर्धापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले आहे.
Sindhudurg News : असनी चक्रीवादळाचा थेट परिणाम कोकणात नसला तरी समुद्र मात्र खवळलेला आहे. कोकणातील वातावरणात कमालीचा बदल झालेला असून संपूर्णपणे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री रिमझिम पाऊस पडला. समुद्र खवळलेला असल्याने त्याचा परिणाम थेट मच्छीमारीवर होत आहे. समुद्र खवळल्याने मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. त्यामुळे असनी चक्रीवादळाचा मासेमारीवर परीणाम होत आहे. तर कोकणात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
Gadchiroli News : गडचिरोली-चंद्रपुरातील सुदृढ हत्ती आणि पिलांना गुजरातमधील जामनगर इथे हलवण्याबाबत अखेर निश्चिती झाली आहे. महाराष्ट्राच्या वनबल प्रमुखांनी आजच एका आदेशाद्वारे एकूण 13 हत्तींना जामनगर इथल्या राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टला सोपवण्यासाठी प्रक्रिया सुरु केली. काही महिन्यांपूर्वी असा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्यभर याचा विरोध झाला होता. मात्र आता केंद्र शासनाने नाहरकत दिल्यानंतर वनविभागाने हे सर्व हत्ती अनेक अटींसह ट्रस्टला देण्याची निश्चिती केली आहे. महाराष्ट्र शासन या हत्तींकरता मोठी सफारी सुविधा निर्माण करणार होतं, मात्र यावर कुठलाही निर्णय न झाल्याने हत्ती गुजरातमध्ये जाणार हे स्पष्ट झालं आहे.
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील वसमत पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या शेख समीर आणि करीम कुरेशी या दोन अभियंत्यांन्या लाच घेताना अटक करण्यात आली आहे. घरकुल लाभार्थ्याला लाभाच्या निधीतील तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी या दोघांनी 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी लाच लुचपत विभागाच्या वतीने सापळा रचून कार्यवाही करण्यात आली. या कारवाईमध्ये दोन्ही अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुकीला परवानगी द्या आयोगाची मागणी, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष?
राज्यातल्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर करण्यात आला आहे. निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सादर अर्जाची एक्स्क्लुझिव्ह कॉपी एबीपी माझाकडे आहे. महापालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी अशी विनंती निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या अशी विनंती देखील केली आहे. जून महिन्याअखेरीस सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड रचना आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करु असं आयोगाने कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटलं आहे. पण त्यानंतर पुढची प्रक्रिया ऐन पावसाळ्यात पूर्ण करावी लागेल. त्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत हे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. पावसाळ्यात मतदान झाल्यास मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते ही भीती देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे?
राहुल गांधी पुन्हा कॉंग्रेस अध्यक्षपदी विराजमान होणार?
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे सोपवावीत अशी मागणी नेहमी होत असते. आता राहुल गांधीही काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती आहे. काँग्रेसची संघटनात्मक मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उदयपूर येथील चिंतन शिबिरात अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार नाही. तसंच संघटनात्मक पातळीवर पूर्ण प्रक्रिया पार पाडूनच राहुल गांधी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील अशी सूत्रांची माहिती आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून कोणी उमेदवारी दाखल करणार का? याबाबत उत्सुक्ता आहे. ठरल्याप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडणार आहे. अशोक गेहलोत, प्रियंका गांधी यांचीही नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत असतात.
यूपीत विरोध, मुंबईत जोरात तयारी; राज ठाकरेंच्या दौऱ्यासाठी मनसे 11 ट्रेन बुक करणार?
भाजप खासदाराकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत आहे. तर मनसेकडून मात्र दौऱ्याची जोरात तयारी सुरु आहे. अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 11 ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रभरातून मनसैनिक राज ठाकरेंच्या आधी अयोध्येत दाखल होतील. मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत मनसे आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा दौरा वादळी होण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -