Lok Sabha elections 2024 Phase Three : राज्यात आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घटलेली आहे. वाढत्या उन्हाचाही परिणाम या लोकशाहीच्या महोत्सवावर झाला असल्याचे दिसून आले आहे. मतदान केंद्रावरील गैरसोयीचा परिणाम टक्केवारीवर होऊ नये म्हणून सर्व स्थरावरील प्रशासन सज्ज झाले आहे. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्यासाठी थंड पाणी, सावलीसाठी 789 केंद्रावर पेंडोल, केंद्रावरील खोल्यांमध्ये पंखा, बसण्यासाठी खुर्च्या अशा प्रकारे सर्व सुसज्ज सुविधा उपलब्ध करुन मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच तयारी केली होती. मात्र, गेल्या 8 दिवसांपासून वाढते ऊन, वातावरणातील वाढलेली आर्द्रता, यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे. 


राज्यातील सर्व स्तरावरील प्रशासन सज्ज


मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्रावर प्रथमोपचार पेटी, आरोग्य कर्मचाऱ्यांकडे ओआरएस उपलब्ध असणार आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रात रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सेवा दिली जाणार आहे. याकरिता आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारीही राबणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी असे 1 हजार 648 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी आरोग्याच्या दृष्टीने केंद्रावर केवळ प्राथमिक उपचार आणि गरज भासेल त्याच ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाणार होते. पण वाढत्या उन्हामुळे प्रशासनालाही नियोजनात बदल करावा लागला आहे. विशेषत: केंद्रावर पिण्याचे पाणी आणि सावली या मुख्य बाबींवर भर दिला जात आहे. 


2115 मतदान केंद्रावर 8500 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त


लातूर लोकसभा मतदार संघात 19 लाख 77 हजार 42 मतदार आहेत. या लोकशाहीच्या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे याकरिता गेल्या काही दिवसांपासून जनजागृती केली जात आहे. मतदानाचे महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने पटवून दिले जात आहे. आता जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नाला कितपत यश मिळणार हे उद्याच्या मतदानाच्या टक्केवारीवरुन समोर येणार आहे. जिल्ह्यातील 2115 मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 16765 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. 2115 मतदान केंद्रावर 8500 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी 8262 अधिकार यांनी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न


मतदान केंद्रावर उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी 1648 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान सुरळीत आणि व्यवस्थित पार पडावं यासाठी सशस्त्र पोलीस दलासह 244 अधिकारी, 3768 अंमलदार आणि 1800 होमगार्डचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान केंद्राचे वेगळेपण म्हणून आणि जिल्ह्यामध्ये असणारे कमी जंगल क्षेत्र यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर बियाणाचा वाटप करण्यात येणार आहे. जवळपास बहुतेक मतदान केंद्र हे सीसीटीव्ही ना जोडण्यात आले आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे मतदान कमी झाल्यामुळे प्रशासन आता तयारीला लागला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या