Maharashtra LIVE Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्रांतीसाठी दरे गावात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
भारत निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या सात जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंडू आठवले या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार असल्याने भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुसऱ्या देशांवर लादण्यात येत असलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हलं. या निर्णयातील माहितीनुसार राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत लागू करण्यात येणाऱ्या कायद्याचा वापर करत ट्रम्प यांनी टॅरिफ लादले. अमेरिकेच्या संविधानानुसार कर आणि टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसून काँग्रेस म्हणजेच संसदेला मिळालेला आहे. मात्र, ट्रम्प यांनी टॅरिफला एक आर्थिक आणि विदेशी धोरणासाठी ढाल म्हणून वापरलं. ट्रम्प यांनी हे निर्णय अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचं म्हटलं होतं. टॅरिफ शिवाय अमेरिका उद्धवस्त होईल, असं ट्रम्प म्हणाले होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत वरिष्ठ योग्य निर्णय घेतील: महेंद्र दळवी
रायगड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत सध्या महायुतीतील सत्ताधारी पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. सर्वाधिक बहुमत मिळालेल्या शिंदे शिवसेनेला भाजप आणि राष्ट्रवादीने बाजूला सारले आहे. मात्र, अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलाय. शिवाय भाजप आणि राष्ट्रवादीने आम्हाला कितीही दूर ठेवलं तरी वरिष्ठ मात्र असं होऊ देणार नाहीत. आमच्याकडे बहुमत असल्याने आम्हाला योग्य न्याय मिळेल, असे सुद्धा दळवी म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्रांतीसाठी दरे गावात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील दरेगाव येथे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी मुक्कामी आहेत. हा दौरा अधिकृतरीत्या विश्रांतीचा असला तरी जिल्ह्यात राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये सध्या त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला 33 चा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही. निवडणुकीत भाजपला 27 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा तर शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच एकनाथ शिंदे दरेगावात असल्याने त्यांच्या भेटीसाठी काही राजकीय नेते येतात का, तसेच सत्तास्थापनेबाबत काही हालचाली होतात का, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
























