Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra Live Updates: हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली. मराठी जागर परिषद भरवण्याचे राज ठाकरेंनी आदेशही दिले आहेत. तर राज्यात विकास कामांसाठी पाच लाख झाडांची कत्तल होणार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. भाजप महाराष्ट्राचं वाळवंट करणार असल्याची टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. तसेच मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरुच ठेवण्याचा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
युवतीचे अश्लील फोटो अपलोड करणाऱ्या युवकास दिल्लीतून अटक
गडचिरोली : इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री निर्माण झाल्यानंतर याचा गैरफायदा घेत एका युवकाने युवतीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी एका युवकाला दिल्लीतून अटक केली आहे. शहानवाज मलिक (22) असे आरोपीचे नाव आहे. अहेरीतील एका तरुणीची दिल्लीच्या शहानवाज या युवकाशी मैत्री झाली. हा युवक कामाच्या निमित्ताने थेट अहेरीत पोचला. त्याने युवतीशी अनेकदा शारीरिक संबंध साधले. मुलीचे दुसरीकडे लग्न जुळले असताना तुझे लग्न होऊ देणार नाही, असे म्हणत त्याने अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. मुलीच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथून शाहनवाज मलिक याला बेड्या ठोकल्या. त्याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने आरोपीस 21 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नागपूरला महापालिकेच्या कचरा डम्पिंग यार्डमध्ये आग
नागपूर : भांडेवाडी परिसरात महापालिकेच्या कचरा डम्पिंग यार्डमध्ये आग लागली आहे. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगामधून धूर निघताना दिसून आले आणि पाहता पाहता कचऱ्याचा एक मोठा ढीग आगीत धुमसू लागला. महापालिका आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कचऱ्याचे ढिगाऱ्यात आग लागल्यामुळे मोठ्या ज्वाळा ऐवजी धूर जास्त निघत असून संपूर्ण परिसरात धूर पसरला आहे.






















