Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. शहरात रात्री आठ वाजेच्या सुमारास...More
विदर्भाची सध्याची पावसाची तूट 22 ते 25 टक्के दरम्यान असली, तरी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पर्यंत ती 30 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे... ऑगस्ट महिन्याच्या उरलेल्या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडणार नाही... फक्त अधून मधून रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाजही हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने व्यक्त केला आहे... दरम्यान सप्टेंबर महिन्यात आधीच सक्रिय असलेला "एल निनो" आणखी सशक्त होईल.. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातही दमदार पावसाची अपेक्षा करणं व्यर्थ असल्याचे संकेत हवामान शास्त्रज्ञांनी दिले आहे... त्यामुळे येणारे दिवस वैदर्भियांसह शेतकऱ्यांसाठी चिंता वाढविणारे असण्याची शक्यता आहे... गेले काही दिवस सातत्याने विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ढगाळी वातावरण असून सुद्धा पाऊस पडत नाही... कारण मान्सूनची द्रोनिका सध्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सक्रिय आहे... तसेच दमदार पाऊस पडेल असा कुठलाही कमी दाबाचा क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत नसल्यामुळे ही विदर्भ, मराठवाड्यासह मध्य भारतातील अनेक भागांमध्ये पावसाची तूट निर्माण झाल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांकडून अखेर परवानगी
22 ऑगस्ट रोजीच्या पुण्यातील कार्यक्रमाला पुणे पोलिसांकडून परवानगी
काही अटी व शर्ती टाकत पुणे पोलिसांकडून राहुल गांधी यांच्या छात्रो की गुंज या कार्यक्रमाला परवानगी
मीरा-भाईंदर : 2023 मध्ये काशिमीरा नाका येथील एका बेकरी शॉपमध्ये झालेल्या गोळीबार आणि खंडणीच्या प्रकरणात फरार असलेला आरोपी अख्तर मर्चंट याला विदेशातून भारतात परतताच दिल्ली विमानतळावर मीरा-भाईंदर क्राईम ब्रँचने अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, अख्तर मर्चंटचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’शी कथित जवळचे संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या अटकेमुळे मीरा-भाईंदरसह मुंबईतील अंडरवर्ल्ड नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे. अटकेनंतर काल रात्री आरोपीला पुढील चौकशीसाठी काशिमीरा क्राईम ब्रँचच्या युनिट क्रमांक 1 मध्ये आणण्यात आले.
2023 मध्ये काशिमीरा नाका येथील इंटरनॅशनल बेकरी शॉपमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन शूटरांना यापूर्वीच अटक केली होती. तपास पुढे गेल्यानंतर गोळीबार आणि खंडणीच्या कटात अख्तर मर्चंटचे नाव समोर आले. त्यानंतर काशिमीरा क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 1 चे पथक त्याचा शोध घेत होते.
या प्रकरणात सीआर क्रमांक 700/2023 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 384, 120(ब), 34 यासह आर्म्स अॅक्ट आणि मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी पप्पू पेजर यालाही मागील वर्षी अटक करण्यात आली होती.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली होती की, अख्तर मर्चंटने पीडित व्यक्तीला फोन करून धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, तो विदेशात असल्यामुळे पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्या हालचालींवर पोलिसांकडून सातत्याने नजर ठेवण्यात येत होती.
अख्तर मर्चंट भारतात परतत असल्याची माहिती मिळताच मीरा-भाईंदर क्राईम ब्रँचने दिल्ली विमानतळावर सापळा रचला. विदेशातून भारतात दाखल होताच पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
अख्तर मर्चंटचे नाव इंटरपोलच्या रडारवरही राहिले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’शी त्याचे कथित जवळचे संबंध असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
अख्तर मर्चंटच्या अटकेनंतर 2023 मधील बेकरी गोळीबार, खंडणी आणि कथित अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मीरा-भाईंदर क्राईम ब्रँचकडून सुरू आहे.
पुण्यातील ARI टेकडीवर तरुणाचा मृतदेह; डोक्यात घाव करून हत्या..
पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ARI टेकडीवर २२ ते २५ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
ARI टेकडीवरून जाणाऱ्या एका वाटसरूला हा मृतदेह दिसल्यानंतर त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
प्राथमिक माहितीनुसार, तरुणाच्या डोक्यात घाव करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक मोबाईल फोनही सापडला आहे.
मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच हत्येचा नेमका प्रकार आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळी आरई टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असतो. या अंधाराचा फायदा घेऊन तरुणाची हत्या करण्यात आली असावी, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.
- नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के
- नाशिकच्या पेठ तालुक्यात आज सकाळी ९ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले.
- गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के.
- भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण.
- मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही.
- नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता.
* मंत्री पंकजा मुंडे नाशिक महानगरपालिकेत दाखल...
* नाशिक कुंभ मेळ्याच्या अनुषंगाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात घेणार बैठक...
* कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री व इतर अधिकारी राहणार उपस्थित ...
* गोदावरी प्रदूषण नियंत्रणा बाबत देखील घेणार आढावा...
सातारा:खटाव तालुक्यातील औंध जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार मनीषा फडतरे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राबाबतचा वाद संपुष्टात आला आहे. विरोधी उमेदवाराने या प्रमाणपत्राच्या वैधतेबद्दल तक्रार दाखल केली होती. मात्र, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दोन्ही बाजूंच्या सुनावणीनंतर त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र वैध ठरवले असल्याची माहिती अँड दत्तात्रय घाडगे यांनी दिली आहे.
मुंबईतील “मेडिसिटी”साठी अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिक सोबत महाराष्ट्र शासनाचा करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
अमेरिका-भारत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासंदर्भात ही दोघांमध्ये चर्चा
अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले कौतुक
"महाराष्ट्र दोन गोष्टींमुळे पुढे आहे
एक तुमच्याकडे मुंबई आहे आणि दुसरीकडे तुमच्याकडे आपल्या कामाप्रती आस्था असलेला नेता आहे"
"तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस"
"मी जगभर फिरलो, अनेक नेत्यांना भेटलो, त्यानंतर हे सांगतो आहे...."
महाराष्ट्राने 'लाडकी बहीण' योजना १.६५ कोटी लाभार्थीवर आणली; बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले?
एकूण ४.५ लाखांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी आणि कर्मचाऱ्यांनी अर्जदारांनी बेकायदेशीरपणे निधी लाटला, माहितीच्या अधिकारात उघड
राज्य शासनाद्वारे राबवण्यात आलेल्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) मोहिमेनंतर महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा आवाका मोठ्या प्रमाणावर कमी, आरटीआय मधून आकडेवारी समोर
या मोहिमेमुळे सक्रिय लाभार्थी महिलांची संख्या जवळपास २.४८ कोटींवरून घसरून थेट १. ६५ कोटी वर
हजारो अपात्र शासकीय कर्मचारी कुटुंबांकडून बेकायदेशीरपणे लाटलेले पैशांची वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्याप ठप्प ? आरटीआय मधून वसुलीची आकडेवारी प्राप्त नाही, आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांची माहिती
ई केवायसी पूर्ण न झाल्याने दुर्गम भागातल्या गरीब महिला अजूनही योजनेपासून वंचित असल्याचा आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांचा दावा
लाभार्थ्यांची संख्या १.६५ कोटींवर स्थिरावल्यामुळे, या योजनेचा आर्थिक भार आता दरमहा २,४८४.९२ कोटी रुपये इतका असून, वार्षिक खर्च २९,८१९.१० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
वगळण्यात आलेल्या घटकांची वर्गवारी
*९२ लाख महिला वगळल्यामाहिती अधिकारातील खुलाशांनुसार, अपात्रतेच्या विविध निकषांच्या आधारे तब्बल ९२.१० लाख नोंदी या मोहिमेदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत:
स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई काढताना घडलेल्या दुर्दैवी अपघातात ४३ वर्षीय राहुल साबळे या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पार्वती इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदार कंपनीत कार्यरत असलेले चार कर्मचारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास प्रभाग कार्यालयाच्या छतावरील रोषणाई काढण्यासाठी गेले होते. पत्र्याच्या शेडवर चढून काम करत असताना राहुल साबळे यांचा अचानक पाय घसरला आणि ते खाली कोसळल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला असून, दापोडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. काम करताना सुरक्षेच्या उपकरणांची आणि योग्य काळजीची झालेली पायमल्ली एका निष्पाप कामगाराच्या जीवावर बेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व दुःख व्यक्त होत असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.
बीडच्या वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथील शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. उसाच्या व कापसाच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.याच माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केलीय.या कारवाईत तब्बल 168 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून,याची अंदाजे किंमत 42 लाख रुपये आहे.सदरील शेत हे संदीपान विठ्ठल शिंदे यांच्या मालकीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान या कारवाईने परिसरात खळबळ उडालीये.
कोल्हापूरच्या महापौरांच्या प्रभागात समस्याचे ग्रहण
खड्ड्यांवर फुलांच्या पाकळ्या टाकून अनोखा आंदोलन
सम्राटनगर-सरनाईक माळ परिसरातील नागरिकांनी चिखलात उभे राहून केली निदर्शने
महापौरांसह चारही नगरसेवक निवडून आल्यावर एकदाही प्रभागात फिरकले नसल्याने नागरिकांचा संताप
परिसरात रस्त्यातील खड्डे, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, कचरा उठाव, गटारांची स्वच्छता या प्रश्नांच्या कडे लक्ष वेधत नागरिकांनी खड्डा भोवती फुले टाकत केलं आंदोलन
आता राज्यातील नवी पोलीस स्टेशन होणार 'अपग्रेड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा निर्णय
नव्या पोलीस स्टेशनची 'अ', 'ब', 'क' अशी वर्गवारी केली जाणार
वर्गवारीनुसार पोलीस स्टेशनमधील पदभरती केली जाणार
सायबर गुन्हे, डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी विशेष मनुष्यबळ भरले जाणार
जिल्हा पातळीवर 'अ' वर्ग,तर तालुका पातळीवर 'ब' वर्ग पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार
तर १५० ते २०० गुन्हे असलेले पोलीस स्टेशनचा समावेश 'क' वर्गात केला जाणार
अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं अ,ब,क,ड नुसार उपवर्गीकरण करावे या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील मातंग समाज रस्त्यावर उतरणार आहे.20 ऑगस्ट रोजी शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मातंग समाजाचा महामोर्चा निघणारा असून या मोर्चात जिल्हा भरातील लाखो समाज बांधव सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकाकडून व्यक्त करण्यात येत आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही याबाबत निर्णय न झाल्याने समाजात नाराजी असल्याने मातंग समाजाकडून महाएल्गार मोर्चा काढण्यात येत आहे .
Ambernath News : अंबरनाथच्या एसीपी स्क्वॉड आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केलीये. या कारवाईत तब्बल 271 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 20 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आलीय. तर 4 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली असून इतर चार जण फरार आहेत.
अंबरनाथ शहरात बदलापूर ग्रामीण पोलिसांनी ड्रग्जवर कारवाई केल्यानंतर अंबरनाथ पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यानंतर अंबरनाथ एसीपी स्क्वॉड आणि अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या पथकाने मागील दोन दिवसांत अंबरनाथच्या भगत सिंग नगर आणि उल्हासनगरमध्ये छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागले. 271 ग्रॅम एमडी, 20 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केलीये. यामध्ये अंबरनाथमधून अयाज सय्यद, नूरजहाँ शेख, शाकीरा अन्सारी आणि शरीफ शेख या चौघांना, तसंच उल्हासनगरमधून दोघांना अटक करण्यात आलीय. तर नियाज सय्यद याच्यासह चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
Maharashtra News : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त एक हजार एकर भूसंपादनाला स्थगिती
- नाशिक महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
- शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याचे न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश
- एकतर्फी जमीन अधिग्रहणास न्यायालयाची स्थगिती
- शेतकरी कृती समितीच्या याचिकेनंतर न्यायालयाचा निर्णय
- महापालिकेकडून अतिरिक्त एक हजार एकर क्षेत्र अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.
- शेतकऱ्यांना नोटिस बजावण्यात आल्यानंतर कृती समितीने न्यायालयात धाव घेतली.
- ३ सप्टेंबरला पुन्हा यावर होणार सुनावणी
- पूर्वी साधूग्राम साठी 350 हून अधिक एकर जागेवर प्रशासनाने टाकल आहे आरक्षण
- ही संपूर्ण जागा कायमस्वरूपी अधिग्रहण करण्याची देखील झाली आहे प्रक्रिया सुरू
- न्यायालयाच्या आदेशाने आधीच विलंबाने सुरू असणाऱ्या कामांना अधिक उशिर होणार, शासन प्रशासन काय बाजू मांडणार याकडे लक्ष
Nagpur News : नागपूरातील सुळा शाळांसह महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय अशा 19 ठिकाणी बामणे उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल "व्ही पी एन" (VPN) तंत्र वापरून पाठवण्यात आला होता. त्यामुळे या व्हीपीएन चा वापर करता नेमका कोण आहे आणि तो कुठे बसला आहे हे अजूनही पोलीस तपासात स्पष्ट होत नाही आहे.
बब्बर खालसा कमांडो फोर्सखाली स्थानी ग्रुपच्या नावाने हे ईमेल परवा रात्री उशिरा सर्व शाळांना आणि कार्यालयांना पाठवण्यात आले होते.
काल दिवसभर नागपूर पोलिसांनी विविध शाळांमध्ये तपासणी करून कुठलाही स्फोटक किंवा बॉम्ब त्या ठिकाणी नाही याची खात्री करून घेतली आहे.
मात्र सा धमकीवजा ईमेल पाठवून खळबळ वाजवणारा व्यक्ती कोण?? याचा शोध पोलीस घेत आहे.
मात्र व्हीपीएन तंत्राचा वापर करून पाठवण्यात आलेला ईमेल नेमका कुठून आला याचा शोध अद्यापही सायबर पोलिसांना लागलेला नाही.
Thane News Upates : ठाण्यातील घोडबंदर रोड येथे भाईंदर पाडा सिग्नलजवळील एका जनरल स्टोअरला पहाटे 3:27 च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आग विझवली, तर जवानांनी कूलिंगचे काम पूर्ण केले असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Thane News : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण - SIR मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हा प्रशासनाने 100 टक्के काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम वेळेत पूर्ण झाले आहे.या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 6 हजार 894 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या - BLO माध्यमातून 4 लाख 63 हजार 143 मतदारांचे 'ईएफ' मुद्रित करून त्याचे 100 टक्के वितरण करण्यात आले आहे. यात एकही ईएफ प्रलंबित राहिला नसून, आतापर्यंत 2 लाख 65 हजार 482 ईएफचे डिजिटायझेशनही पूर्ण झाले आहे.
Maharashtra News : करवाढीवर चर्चा करू दिली नसल्याचा भाजपचा आरोप,तर प्रस्ताव एकमताने मंजूर असल्याचे शिवसेनेचे स्पष्टीकरण...
सर्वसामान्य ठाणेकरांवर लादलेल्या करवाढीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये मालमत्ता करवाढीवर सभागृहात चर्चा करण्याचे निश्चित झाले असताना मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने चर्चा करून न देताच करवाढीला मंजुरी दिली असल्याचा आरोप आता भाजपने केला आहे. या करवाढीचा आमचा विरोध असल्याच भाजपच्या नगरसेवकांच्या स्वाक्षरी असलेले पत्र उपमहापौर कृष्णा पाटील आणि गटनेते मुकेश मोकाशी यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांना दिले आहे. तर भाजपच्याच नगरसेवकांनी या विषयावर चर्चा केली नसल्याचे सांगत करवाढीचा प्रस्ताव हा एकमताने मंजूर करण्यात आला असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे करवाढीवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. या प्रस्तावाला ठाणे महापालिकेच्या सभागृहात देखील मंजुरी मिळाली आहे. मात्र या मंजुरीवरून आता भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. या करवाढीचा भाजपच्या 28 नगरसेवकांनी आपला विरोध दर्शवला आहे. निवासी मालमत्तांवर 12 टक्के, वाणिज्य मालमत्तांवर 20 टक्के वाढीला विरोध; केला असून आधी थकबाकी वसुली करा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. ही करवाढ सामान्य ठाणेकरांवर आर्थिक बोजा टाकणारी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. करवाढीचा प्रस्ताव रद्द करावा, तसेच महापालिकेकडे प्रलंबित असलेली मोठ्या प्रमाणावरील मालमत्ता कराची थकबाकी प्रथम वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावावर सभागृहात अपेक्षित चर्चा न होता तो मंजूर करण्यात आल्याचा आक्षेप भाजपच्या नगरसेवकांनी घेतला आहे. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन करवाढीला स्पष्ट विरोध नोंदविला आहे. या पत्रावर भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह एकूण 28 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भाजपच्या पत्रानुसार, ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचे विविध स्रोत असताना त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासह शहर विकास, पाणीपुरवठा, जाहिरात विभाग तसेच एलबीटीसारख्या विविध विभागांकडील अंदाजे 1200 ते 1500 कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांवर नव्याने करवाढ लादण्यापूर्वी प्रशासनाने प्रलंबित थकबाकीची प्रभावीपणे वसुली करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, या करवाढीविरोधात भाजपने आता व्यापक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. महायुतीला विश्वासाने सत्ता सोपविणाऱ्या ठाणेकरांच्या अपेक्षांचा विचार न करता मालमत्ता करवाढ करण्यात आली असून हा ठाणेकरांचा विश्वासघात आहे, अशी टीका भाजपने केली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला ठाणेकरांनी मोठ्या अपेक्षेने कौल दिला. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असताना करवाढीचा निर्णय घेणे योग्य नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या करवाढीचा ठराव रद्द करण्यासाठी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी करण्यात येणार असल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील आणि गटनेते मुकेश मोकाशी यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले असून गटनेत्यांच्या बैठकीत जी चर्चा होते त्याची अंमलबजावणी शिवसेनेकडून केली जाते. भाजपच्याच नगरसेवकांनी या विषयावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता हा विषय सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला असल्याचे शिवसेनेचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी स्पष्ट केले.
तर भाजप आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासनाला याबाबत पत्र देऊन मालमत्ता करामध्ये जेवढी रक्कम वसूल होणार आहे ती आधी वसूल करा, मी तर यादी दिलेली आहे 2016 पासून किती मालमत्ता कर बाकी आहे ती कमीत कमी पाच ते सहाशे कोटी पर्यंत जाईल, यांचा ऑडिट रिपोर्ट देखील आलेला नाही, एकीकडे तुम्ही कर लावायला जाता पण जो बाकी आहे तो तरी वसूल करा, पाचशे ते साडेपाचशे कोटींची थकबाकी आहे ती तुम्ही वसूल करत नाही आणि छाती बडवत फिरत असाल पैसे नाहीत म्हणून, करवाड केली असेल तर काही हरकत नाही पण,ती किती करायला हवी, उगाच अव्वाच्या सव्वा दरात करवाढ केली तर ती ठाणेकर सहन करणार नाहीत अशा शब्दात केळकर यांनी विरोध केला आहे.
Maharashtra News Update : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे घेणार नाशिक महापालिकेत आढावा बैठक
आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता बैठक घेतली जाणार आहे. नाशिक महापालिकाचे सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. शहरातील गटाराचे पाणी गोदावरी, नंदिनी नदी पात्रात सोडले जात असल्याने नदी प्रदूषणात भर पडली आहे. आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर शहरात नवीन मलजल शुद्धीकरण प्रकल्प उभारले जात असल्याने या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. कुंभमेळा आधी गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पंकजा मुंडे काय सुचना करतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे.
Maharashtra News : भाजपची आज नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या संघटनात्मक कामाचा आणि SIR कामाचा आढावा घेतला जाणार आहे. सकाळी 10.30 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे.
- पुढील टप्प्यातील संघटनात्मक कामकाज आणि रणनीतीवर बैठकीत मंथन
- उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मंत्र्यांची बैठकीला उपस्थिती
- भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय कार्यालय प्रभारी तरुण चुग यांची प्रमुख उपस्थिती
- नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार
- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री जयकुमार रावल, संजय सावकारे, अतुल सावे यांचीही उपस्थिती
- आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी आणि एसआरए विधानसभा प्रभारी बैठकीला सहभागी होणार
- बूथस्तरापासून संघटन मजबूत करण्यासह आगामी राजकीय रणनीतीवर होणार सविस्तर चर्चा
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हा फुलशेतीकडे वाढला असला, तरी यंदा जिल्ह्यात फुल शेतीचे क्षेत्र घटले आहे...मागील दोन वर्षांच्या तुलनेत फुलांचे क्षेत्र 312 हेक्टरने घटले आहे...सध्या 836 हेक्टरवर फुल शेती करण्यात आलीये...गेल्यावर्षी फुल शेती खालील क्षेत्र हे 1148 हेक्टर होते...दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि नगर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फुल शेती करतात...मात्र यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी झालेला पाऊस, सततचे ढगाळ वातावरण यामुळे फुल शेतीचे क्षेत्र घटले आहे...त्यामुळे येऊ घातलेल्या सण-उत्सवाच्या काळात बाजारात फुलांची आवक देखील घटण्याची शक्यता आहे...त्याचा परिणाम फुलांच्या दरावर देखील होऊ शकतो.
शिवसेना (शिंदे गट) लोकप्रतिनिधींना म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण
शिवसेना (शिंदे गट)कडून लोकप्रतिनिधींच्या कॅडर डेव्हलपमेंटसाठी प्रशिक्षण उपक्रमाला सुरुवात.
उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत नगरसेवकांना प्रशासन, शहर नियोजन, विकास आराखडा, सरकारी योजना आणि विकासकामांसाठी निधी मिळवण्याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.
कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरमधील १५० हून अधिक लोकप्रतिनिधींनी प्रशिक्षण घेतले.
ठाण्यातील नगरसेवकांसाठी २४-२५ ऑगस्टला प्रशिक्षण, तर सप्टेंबरमध्ये नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेलमधील नगरसेवकांचे प्रशिक्षण होणार.
नगरसेवकांनंतर आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांसाठीही चिंतन शिबिराचे नियोजन केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दि
गणपती आगमनादरम्यान ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांचा कारवाईचा बडगा
आगमन सोहळ्यादरम्यान ड्रोन उडवताना आढळणाऱ्यांवर भारतीय
न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत कारवाई
काळाचौकी परिसरात महागणपतीच्या आगमन सोहळ्या दरम्यान ड्रोनच्या मदतीने चित्रीकरण करणाऱ्या दोघांवर काळाचौकी पोलिसांची कारवाई
१.८७ लाखांचे दोन ड्रोन केले पोलिसांनी जप्त
मुंबईत विनापरवाना ड्रोन उडवण्यास निर्बंध आहेत
नागपुरातील रेडिसन ब्लू हॉटेलच्या बाजूला असलेल्या बंद कोका-कोला कारखान्यात मंगळवारी सकाळी कचऱ्याला आग लागली. आग विझवण्यासाठी पोहोचलेल्या अग्निशमन पथकाला एका खोलीत जळालेल्या अवस्थेत अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
आज सकाळी अग्निशमन नियंत्रण कक्षाला रेडिसन ब्लू हॉटेल जवळील बंद अवस्थेत असलेल्या कोकाकोला फॅक्टरीत आग लागल्याची माहिती मिळाली. नरेंद्रनगर अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. यावेळी एका खोलीत जळालेला मृतदेह आढळला.
मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने अद्याप ओळख पटलेली नाही. प्रतापनगर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून बेपत्ता व्यक्तींची माहितीही घेतली जात आहे. हत्या करून मृतदेह जाळल्याची शक्यताही पोलिसांकडून तपासली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलिस स्टेशन अंतर्गत "कमांडो अकॅडमी" या सैनिकी प्रशिक्षणासाठीच्या प्रशिक्षण केंद्रात एका 17 वर्षीय विद्यार्थिनी सोबत लैंगिक आणि मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे.. धक्कादायक म्हणजे या संदर्भात पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत प्रशिक्षण केंद्राच्या संचालकावरच लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहे... पीडित मुलीच्या तक्रारीनंतर प्राथमिक चौकशी करत पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत आरोपी संचालक हरिश्चंद्र राणे याला अटक केली आहे...
पीडित विद्यार्थिनीचा आरोप आहे की अकॅडमी चा संचालक नेहमीच विद्यार्थिनींसोबत लगट करण्याचा प्रयत्न करायचा.. सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली शारीरिक प्रशिक्षणाच्या वेळेला बॅड टच करायचा... दरम्यान या प्रशिक्षण केंद्रात इतर विद्यार्थ्यांनी सोबतही अशी घटना घडली आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत.
केजच्या टाकळी येथील मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले
विलास घुले प्रकरणात गेल्या 14 दिवसांपासून उपोषण करत आसलेल्या रमेश घुले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले
रमेश घुले यांची प्रकृती काल खालावली होती काल उपोषण स्थळी त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले.मात्र त्यांची आज प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवले.
सीडीआर प्रमाणे तपास करून आरोपी पकडावेत यासाठी रमेश घुले गेल्या 14 दिवसापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत
जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. शहरात रात्री आठ वाजेच्या सुमारास धान्य व्यापाऱ्यावर हल्ला करून सुमारे १५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
शहरातील धान्य व्यापारी अजय कोटेचा (रा. टीव्ही टॉवर मैदान परिसर) यांचे बाजारपेठेत दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून ते दुचाकीने घरी जात असताना टीव्ही टॉवर केंद्राजवळील दूरदर्शन केंद्राच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर, दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
हल्लेखोरांनी प्रथम त्यांच्या डोळ्यांवर मिरचीची पूड तसेच काहीतरी स्प्रे फेकला. त्यामुळे कोटेचा गोंधळून गेले. त्यानंतर हल्लेखोरांनी कठीण वस्तूने त्यांच्यावर प्रहार केला. यात त्यांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्या जवळील रोकड असलेली बॅग हिसकावून दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.
घटना घडलेल्या परिसरात अंधार असल्याने हल्लेखोरांनी त्याचा फायदा घेतल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जखमी अजय कोटेचा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून त्याआधारे संशयित आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संवेदनशील व अंधाऱ्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता