Maharashtra live blog updates: राज्यात लवकरच काँग्रेस पदाधिकऱ्यामध्ये मोठे फेरबदल; 36 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षसह पदाधिकारी बदलणार
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra live blog updates: प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई एमएमआर क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी ‘पॉड टॅक्सी’ सेवा एमएमआरमधील शहरांत सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला. नागरिकांना 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' देण्यास महापालिकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. नंदनवन येथे झालेल्या या आढावा बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त अश्विन मुदगल, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आदी अधिकारी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रवाशांना घरापासून रेल्वे किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत आणि तिथून गंतव्य स्थान हा टप्पा पार करण्यासाठी रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावे लागते. यासाठी होणारी गर्दी, तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी चालवण्याचे नियोजन करावे. यामुळे मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होईल आणि रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी होईल. हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीएची मदत घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत. महापालिकांनी आपल्या विकास आराखड्यात लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून इंधन बचतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुलुंडमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला; उत्तर प्रदेशातील सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू
मुलुंड परिसरात मेट्रो प्रकल्पाचा सिमेंट स्लॅब रिक्षावर कोसळून उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याचे सरपंच रामधन यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामधन यादव हे माजी सरपंच महेंद्र यादव यांच्यासह मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मुलुंडमधील मित्राच्या दुकानातून कळव्यातील नातेवाईकांच्या लग्नासाठी जात असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
व्हॅलेंटाईन डे विरोधात अकोला शहरात बजरंग दलाचे आंदोलन
अकोला : शहरात व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आज जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. शहरातील सरकारी बगीचा परिसरात विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात घोषणाबाजी केली. 14 फेब्रुवारी हा दिवस ‘ब्लॅक डे’ म्हणून पाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, सार्वजनिक ठिकाणी काही प्रेमीयुगलांकडून अश्लील कृत्ये केली जात असून त्यामुळे सामाजिक मूल्यांना धक्का बसत आहे. सार्वजनिक ठिकाणे कुटुंबीय, महिला आणि लहान मुलांसाठी सुरक्षित राहावीत, अशी मागणीही संघटनांनी केली. तसेच, शहरातील सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.
























