Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: मुंबई आणि उपनगर परिसरात मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे लोकल ट्रेनच्या सेवेवर परिणाम झाला आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु...More
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
राज्यातील आमदारांचे प्रलंबित प्रश्न, अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सुरू असलेली चौकशी आणि अर्थ खाते मिळण्याबाबत भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती
सुनेत्रा पवार यांच्यासोबत पक्षाचे मंत्री देखील बैठकीला उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती
अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी चौकशीबाबत माहिती मिळावी यासाठी आधीच आमदारांचं पत्र देण्यात आलं आहे
अर्थखात्याच्या अनुषंगाने देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे शिल्पकार अमित शाह यांची यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली आहे
सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बेलापूर दरम्यानची सर्व स्थानके मे २०२६ मध्ये एका करारान्वये खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहेत. येथील रेल्वे स्थानकांची विकासकामे करण्याची जबाबदारी आता मध्य रेल्वे प्रशासनाची आहे. या रेल्वे स्थानकांमधील विकासकामे तात्काळ मार्गी लावून प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही विकासकामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत मे २०२६ मध्ये एका करारान्वये सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली. ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स-दरावे आणि बेलापूर या स्थानकांची देखभाल व दुरुस्ती बरोबरच मुलभूत सुविधा आता मध्य रेल्वे प्रशासन देणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्दशनास आणून दिली.
ऐरोली आणि रबाळे येथे तिकीट खिडक्या बंद असून शौचालये जीर्ण अवस्थेत आहेत. पायऱ्या आणि फरश्या तुटलेल्या आहेत. घणसोली आणि कोपरखैराणे येथे प्रचंड वर्दळ असूनही तिकीट काउंटर अस्वच्छ असून सर्वत्र धूळ साचलेली आहे. तुर्भे आणि सानपाडा स्थानकांत शौचालयांमध्ये तीव्र दुर्गंधी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि अपुरी प्रकाशव्यवस्था आहे. जुईनगर आणि नेरुळ रेल्वे स्थानकात पादचारी पुलांची दयनीय अवस्था असून काही खिडक्या बंद असल्यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांग लागते. सीवूड्स-दरावे आणि बेलापूर रेल्वे स्थानकांमध्येही स्वच्छतेचा आभाव दिसून येतो. सर्व स्थानकांतील पायऱ्या आणि पादचारी पुलांची, बसण्याच्या बाकांची तात्काळ दुरुस्ती करावी, शौचालयांचे नूतनीकरण आणि २४ तास स्वच्छता, पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, सर्व तिकीट खिडक्यांचे नियमित संचालन व्हावे, सुरक्षा आणि पुरेशी प्रकाशयोजना असावी, स्थानक परिसरात पुरेसे एलईडी दिवे लावावेत, रात्रीच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची (जीआरपी/आरपीएफ) गस्त वाढवावी या प्रमुख मागण्यांची पुर्तता करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही नवी मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांना दिली.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर
पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला सोलापुरात अटक
TET पेपरफुटीचे तपास करणाऱ्या विशेष पथकाने सोलापुरातून प्रकाश पवार याला अटक केलीय
सोलापुरातील कुमठे गावात प्रकाश पवार हा ध्रुव प्रतिष्ठान नावाने पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता
जवळपास 15-20 वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करणारी अकॅडमी चालवतो
TET पेपरफुटी प्रकरणात या आधी अटकेत असलेल्या आरोपीशी प्रकाश पवार हा संपर्कात होता तसेच काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे देखील त्याने मुख्य आरोपीना दिल्याची प्राथमिक माहिती आहे
प्रकाश पवार याचा या पेपर फुटी प्रकरणात नेमका संबंध काय होता? विद्यार्थ्यांची कागदपत्रे त्याने आरोपीना का दिली याचा तपास सध्या पोलिसांमार्फत सुरूय
कडेगावहून विट्याकडे येत असताना मनोज जरांगे पाटील यांच्या एका कार्यकर्त्याचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जरांगे पाटील यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जरांगे पाटील यांनी जखमी कार्यकर्त्याला स्वतः बसलेल्या गाडीतून विटा येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, विट्यात होणारे स्वागत नाकारत त्यांनी कार्यक्रमस्थळी न थांबता थेट रुग्णालयाकडे गाडी वळवली. या प्रसंगातून जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्याच्या उपचारांना प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले.
पालघर: जिल्ह्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आज जव्हार परिसरातील काही गावांमध्ये NDRFच्या पथकाकडून भूकंपाच्या वेळी घ्यावयाची खबरदारी आणि बचावकार्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
भूकंपाच्या वेळी नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःचा आणि इतरांचा बचाव कसा करावा, घरामध्ये असताना तसेच घराबाहेर असताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत NDRFच्या जवानांनी ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे प्रतिसाद देता यावा, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्या मुलावर हल्ला केला आहे. चिंचवड येथील चिंचवडेनगर परिसरात चार-पाच भटक्या कुत्र्यांनी मिळून एका चिमुकल्या मुलावर हल्ला केला आहे. भटके कुत्रे चिमुकला मुलावर हल्ला करत असतानाची संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सुदैवाने शेजारी राहणाऱ्य नागरिकांनी लगेच चिमुकल्या मुलाची भटक्या कुत्र्याच्या तावडीतून सुटका केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरात वारंवार भटके कुत्रे लहान मुलांवर जीवघेणे हल्ले करत असल्याने शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तातडीने शहरातील भटक्या कुत्र्यांची उपायोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
मुंबईतील लोअर परळ येथील सेंच्युरी मिल्सच्या २३,८२२ चौरस मीटर भूखंडाच्या ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याचा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी मुंबई महापालिकेच्या सुधार समितीसमोर येणार आहे. या भूखंडासाठी पेडर रिअॅल्टीने १,३५१ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली असून, महापालिकेने १,३४८ कोटी रुपयांची राखीव किंमत निश्चित केली होती.
या भूखंडासाठी पेडर रिअॅल्टीसह के. रहेजा कॉर्प, कीस्टोन रिअॅल्टर्स आणि शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट या चार विकासकांनी मार्चमध्ये बोली सादर केली होती.
सेंच्युरी मिल्सचा हा भूखंड सध्या २३ इमारती आणि ४७६ सदनिकांचा आहे. या ठिकाणी पात्र गिरणी कामगारांच्या कुटुंबांचे वास्तव्य असून, त्यांचे पुनर्वसन पुनर्विकासाचा भाग म्हणून कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. याशिवाय येथे १० दुकानेही आहेत.
या भूखंडाचा मूळ भाडेपट्टा १९२७ मध्ये सेंच्युरी स्पिनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडला २८ वर्षांसाठी देण्यात आला होता. हा भाडेपट्टा १९५५ मध्ये संपला. आता महापालिकेच्या अटींनुसार नव्याने ३० वर्षांसाठी भाडेपट्टा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
१२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या BMC सुधार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
वसई-विरार : वसई-विरार महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांनी आज अचानक पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा मोठा फटका सकाळी प्रवाशांना बसला. सकाळपासून सुरू असलेल्या पावसात बससेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांना बसस्थानकांवर भर पावसात तासन्तास बसची वाट पाहावी लागली.
या आंदोलनाची कोणतीही पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे कामावर निघालेल्या अनेक नागरिकांना बससेवा बंद असल्याची माहिती नसल्याने मोठा मनस्ताप आणि कामावर पोहोचण्यास विलंब झाला. रिक्षांचा पर्याय स्वीकारताना काही ठिकाणी जादा भाड्याचा फटका बसला, तर रिक्षाही सहज उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
पावसात भिजत एक-एक तास बसची प्रतीक्षा करूनही बस न आल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे या गंभीर परिस्थितीत परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन न उचलल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात आला. त्यामुळे अचानक आंदोलन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरात आज पहाटे एका गल्लीत रस्त्यावर पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत अर्भक आढळल्याने ते पहाटेच अज्ञात व्यक्तीने येथे फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील गल्लीतील रस्त्यावर अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने अर्भक फेकून तेथून पळ काढल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
अवयव प्रत्यारोपणासाठी आज पुणे विमानतळावरून मुंबईच्या दिशेने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले होते. अवयवाच्या वाहतुकीसाठी एका खाजगी विमान कंपनीच्या विमानाचा वापर करण्यात आला. हे विमान पुणे विमानतळावरून दुपारी ४ वाजता रवाना होऊन सुमारे ४.३० वाजता मुंबईत पोहचले. हा मानवी अवयव पुण्यातील भारती हॉस्पिटलमधील दात्याकडून प्राप्त करण्यात आला होता. त्यानंतर तो मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. तेथे अवयव प्रत्यारोपणासाठी संबंधित रुग्णाचे वैद्यकीय पथक त्याची प्रतीक्षा करत होते. अवयवाची सुरक्षितता आणि गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी तो विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेल्या इन्सुलेटेड आइस बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता. पुणे ते मुंबई या मार्गावर कमी वेळेत अवयव पोहोचविण्यात आल्याने प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी ही वाहतूक महत्त्वाची ठरली असल्याची माहिती पुणे विमानतळ व्यवस्थापनाने दिली आहे.
नांदेडच्या गजबजलेल्या वजीराबाद बाजारपेठेत दोन गावगुंडाची मुजोरी पहायला मिळाली होती. गुंडांनी एका व्यापाऱ्याकडे फुकटात केक देण्याची मागणी केली, मात्र दुकानदाराने केक देण्यास नकार देताच गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर आरोपींनी दुकानातील रक्कम देखील पळवली होती. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने या गुंडाचा शोध घेतला. त्यानंतर या गुंडांनी जिथे दादागिरी केली त्याच भागात त्यांची धिंड काढण्यात आली. त्यासोबतच या गुंडांना माफी मागायला लावून त्याचे व्हीडिओ देखील व्हायरल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या गुंडाचा तातडीने माज उतरवल्याने व्यापाऱ्यानी समाधान व्यक्त केलय.
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव नाका येथील श्री जैन ज्वेलर्स या दुकानात चोरट्यांनी रात्री शटरचे सेंटर लॉक तोडून चोरी केली. चोरट्यांनी दुकानातून सुमारे ७ ते ८ किलो चांदी लंपास केली असून, तिची किंमत अंदाजे १६ ते १७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेला. घटनेची माहिती मिळताच तुळिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे झोन 10 वरून 13 करण्याच्या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक बंडू राऊत यांनी वाढती लोकसंख्या लक्षात घेता झोनची संख्या वाढविण्याची मागणी केली.
मात्र, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी या प्रस्तावाला विरोध केला. झोन वाढविण्याच्या मागणीमागे काँग्रेसचे सभापती हटवून सत्ता हस्तगत करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. मुस्लिम लीग आणि एमआयएमच्या नगरसेवकांनीही प्रस्तावाला विरोध दर्शवला.
यानंतर दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी झाल्याने सभागृहातील वातावरण तापले. अखेर महापौर नेता ठाकरे यांनी प्रशासनाला झोन वाढीबाबत रीतसर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. सभागृहात सविस्तर चर्चा झाल्यानंतरच हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचून गंभीर परिस्थिती उद्भवते. यावर आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदापासून कृत्रिम पर्जन्य (एआय) आधारित सेंसर प्रणाली, पूरपूर्व इशारा यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपाययोजनांचा वापर केला आहे. या ‘एआय पॅटर्न’चा राज्यातील सर्व महानगरपालिकांनी अवलंब करावा, असे निर्देश राज्य विधिमंडळ आश्वासन समितीचे प्रमुख रवी राणा यांनी नुकतेच दिले.
रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली आश्वासन समितीची बैठक विधिमंडळात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला समितीचे सदस्य, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध महापालिकांचे आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई महानगरपालिका आदी उपस्थित होते.
समितीचे महत्त्वाचे निर्देश
* नदी-नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्यासाठी तातडीने कारवाई करावी.
* प्रलंबित नागरी प्रकल्प २०२७ पूर्वी पूर्ण करावा.
* अनधिकृत होर्डिंग्ज आणि लेआउटबाबतच्या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा.
* नालेसफाई आणि नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांमधील कथित अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करावी.
* नदी-नाल्यांच्या परिसरातील नागरिकांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करून नाल्यांचे रुंदीकरण, गाळ काढणे आणि पाणी साठवण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
मुंबई महापालिकेच्या उपाययोजनांचे सादरीकरण
पीएमआरडीए, नगरविकास विभाग, संसदीय कार्य विभाग आणि विधानभवन सचिवालयातील अधिकाऱ्यांसमोर आश्वासन समितीसमोरील २८ प्रश्नांवर सुनावणी पूर्ण झाली. राज्यातील पूरनियंत्रण, नाले रुंदीकरण, नदीपात्रांची स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, नागरिकांचे पुनर्वसन आणि विविध महापालिकांतील प्रलंबित विकासकामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत मुंबई महापालिकेने पूरस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या अंमलबजावणीचे सादरीकरण केले. मुंबई महापालिकेने पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नालेसफाई, गाळ काढणे, पंपिंग व्यवस्था, पूर्वसूचना प्रणाली आणि संवेदनशील ठिकाणांवरील उपाययोजना केल्या आहेत. यांचा राज्यातील इतर महापालिकांनीही त्यानुसार आराखडा तयार करावा, असे समितीने स्पष्ट केले.
राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी प्रदूषण, पर्यावरण, नागरी विकास, पूरनियंत्रण आणि अतिक्रमण या विषयांवर सविस्तर अहवाल सादर करावा, असा सूचनाही बैठकीत देण्यात आला.
वाशिमच्या मंगरूळपीर शहरातील राशिद नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 6 ते 7 सशस्त्र दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातल्याची घटना घडली. दरोड्यादरम्यान प्रतिकार करणाऱ्या 36 वर्षीय मोहम्मद वाजिद मोहम्मद अय्यूब यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला करत घरातून रोख ५लाख रुपया सह सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केलाय.या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय... या घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करत.पोलिसांची तपास पथक नेमत दरोडेखोरांचा शोध सुरू केलाय.
7 वेळा कॉल करून २ तास वाट पहिली तरीही १०८ ही रुग्णवाहिका पोचली नसल्याने परभणीच्या जिंतूर मधील गर्भवती मातेचा बाळासह मृत्यू झाला होता या प्रकरणात मृत महिलेच्या नातेवाईकांनी करवाईसाठी आंदोलन केले होते त्यानंतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता यात १०८ या रुग्णवाहिका सेवा प्रशासनाने कारवाई केली असून ४ जणांना निलंबित करण्यात आले आहे.१०८ रुग्णवाहिकेचा चालक मोहन्मद जलाल,केशव यादव तसेच डॉक्टर अभिजीत इप्पर आणि कुलदीप चोरमले यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून आरोग्य विभागाने ही या प्रकरणाची चोकशी करण्यासाठी ७ सदस्यीय समिती गठीत केली असून ही समिती संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करणार आहे.
ठाण्यातील ओवळा नाका परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान कंत्राटदाराच्या बेजबाबदार कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळता थेट मेट्रो स्टेशनच्या फूटओव्हर ब्रिजवरून बांधकामाचा मलबा आणि दगड खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपर वर फेकल्याची घटना घडली आहे.
शॉर्टकटच्या नादात कर्मचाऱ्यांनी केलेल्या या प्रकारामुळे खाली रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एका सजग नागरिकाने या निष्काळजीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली, तरी सार्वजनिक सुरक्षेशी खेळ करणाऱ्या कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांवर या संबंधित मेट्रो प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी ठाणेकरांकडून केली जात आहे.
Nashik News: नाशिकसह पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी मध्यरात्री जव्हार-विक्रमगड परिसराला सलग तीन भूकंपाचे धक्के जाणवले. यातील दोन धक्क्यांची तीव्रता 3.2 आणि 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, रात्री 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास जाणवलेल्या आणखी एका धक्क्याची नोंद उपलब्ध झालेली नाही.
Washim News: वाशिमच्या मंगरूळपीर शहरातील राशिद नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 6 ते 7 सशस्त्र दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातल्याची घटना घडली.
दरोड्या दरम्यान प्रतिकार करणाऱ्या 36 वर्षीय मोहम्मद वाजिद मोहम्मद अय्यूब यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला करत घरातून रोख ५लाख रुपया सह सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केलाय.या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करत.पोलिसांची तपास पथक नेमत दरोडेखोरांचा शोध सुरू केलाय.
Pune Crime: वडापाव खरेदी करताना पाय लागल्याने गणेश पेठेत तरुणाची हत्या
गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकातील घटना
शिवम परदेशी असं 28 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचं नाव
याप्रकरणी वैभव साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल
वडापाव घेताना एकमेकांच्या पायाला पाय लागला आणि त्यानंतर वैभवने शिवम च्या छातीवर बुक्क्या मारल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू
शिवम आणि वैभव दोघं गणेश पेठ परिसरात राहतात. दोघांची तोंड ओळख आहे. वैभव हा बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरी करतो आणि दोघांचंही वडील रिक्षा चालक आहेत.
Virar Crime: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिर्साट फाटा ब्रिजखाली वसई क्राईम ब्रँच युनिट-2ने मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या MH 48 BT 866 क्रमांकाच्या कारमधून या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, कारमध्ये 500 रुपयांच्या तब्बल 20 हजार बनावट नोटा एका बॅगेत आढळून आल्या. या नोटांची एकूण दर्शनी किंमत तब्बल एक कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, या बनावट नोटा सुमारे 30 लाख रुपयांना विकण्याचा डाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Nagpur Crime: नागपुरातील मे. चंद्रा डेअरी आणि मे. शिवम डेअरी फूड प्रॉडक्ट्सवर एफडीएने कारवाई करत जवळपास 24 हजार किलो प्रतिबंधित चीज अॅनालॉगचा साठा जप्त.
‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत दोन्ही आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
चंद्रा डेअरीकडील 22 हजार 35 किलो, तर शिवम डेअरीकडील 1,930 किलो साठा जप्त करण्यात आला.
दोन्ही ठिकाणचा दही व चीज अॅनालॉगचा 13 हजार 866 किलो साठा नष्ट करण्यात आला.
या साठ्याची किंमत 12 लाख 16 हजार 630 रुपये आहे.
महाराष्ट्रात चीज अॅनालॉगचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर 30 जुलैपासून प्रतिबंध आहे.
बुटीबोरीतील अजित डिलाइट प्रा. लि. येथे लेबल नियमांचे उल्लंघन आढळल्याने 9,827 किलो रस्क जप्त करण्यात आला.
Maharashtra News: मराठवाड्यातील सोयाबीनवर क्लोरोसिस आणि येलो मोझॅकचे संकट
अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाला प्रभाव
शेतकऱ्यांनी घाबरून न जाता या कराव्यात उपाययोजना
वनाम कृषी विद्यापीठातील तज्ञानी सुचवल्या उपाययोजना
मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक आणि क्लोरोसिस या रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.अनेक ठिकाणी सोयाबीनच्या पिकावर या रोग-किडीचा मोठा परिणाम झाला असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.पिकाची पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे तसेच झाडांची प्रतिकारशक्ती कमी होणे अशी लक्षणे काही भागांत दिसून येत आहेत.त्याचबरोबर चक्री भुंग्यांमुळे सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होत असल्याचेही समोर आले आहे.मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिकाची नियमित पाहणी करून प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊन योग्य वेळी उपाययोजना कराव्यात, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
Amravati News: अमरावतीच्या अर्जुननगर येथील गोळीबार प्रकरण..
धक्कादायक... निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांनी स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणला...
गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासाच्या आत या थरारक घटनेचा पर्दाफाश केला...
विपुल ठाकरे यांनी स्वतःच्या घराच्या दिशेने फायर करण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली होती...
गुन्हे शाखेने केले चार आरोपींना अटक...
फरार असलेला निलंबित विपुल ठाकरे यांचा धक्कादायक कारणामा..
न्यायालयात आपली बाजू मजबूत करण्यासाठी विपुल ठाकरे यांनी हा बनव रचला असावा अशी पोलिसांना शक्यता...
दोन आरोपी बुरखा घालून दुचाकी वरून आले आणि त्यांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये झाली आहे कैद
Pune News: 22 लाखांची लाच मागणाऱ्या एक्साईजच्या निरीक्षकाला अटक
मद्य विक्रीसाठी आवश्यक असलेल्य FL 3 परवानाच्या कामासाठी मागितली होती 22 लाख लाच
तडजोडीनंतर अकरा लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
जितेंद्र पाटील असं निरीक्षकाचे नाव
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
येरवडा पोलिसांकडून जितेंद्र पाटलांना बेड्या
37 वर्षीय व्यावसायिकाने एसीबी कडे केली होती तक्रार
तक्रारदार हे लायसन्स कन्सल्टंट म्हणून व्यवसाय करतात त्यांच्याच एका फॉर्मला FL थ्री परवाना मिळवून देण्यासाठी सुरुवातीला 12 रुपये लाख रुपये आणि अन्य कामांसाठी आठ लाख रुपये अशी 20 लाखांची मागणी केली. मात्र या सगळ्यांमध्ये दोघांमध्येही तडजोड झाली त्यात अकरा लाख रुपये देण्याची मागणी मान्य झाल्याचा तक्रारीत म्हंटल आहे.
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा नुकताच महाराष्ट्रच्या विधिमंडळात मंजूर झालाय. या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात नोंद झालाय. ब्रिटन हून आलेल्या एका धर्मगुरूकडून पुण्यातील गुरुवार पेठेतील चर्चमध्ये प्रवचन दिले जात होतं. मात्र या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आणि पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर ब्रिटिश नागरिक असलेल्या या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अंधेरीत रिक्षातील महिलेची पर्स हिसकावणारे दोघे जेरबंद; जबरी चोरीचा गुन्हा उघड
रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातावर मारून पर्स हिसकावणाऱ्या दोन मोटारसायकलस्वारांना अंधेरी पोलिसांनी केली अटक
२६ जुलै रोजी गुंदवली मेट्रो स्थानकाजवळ घडली होती घटना
काळ्या रंगाच्या KTM Duke मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी महिलेची पर्स जबरदस्तीने हिसकावली
पर्समध्ये रोख ३ हजार रुपये होते
सुप्रिया दत्ता दर्गे (वय ४०) यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला
एकलाक मोबीन अन्सारी (२५) आणि निलेश रामचरण यादव (२२) अटक
एकलाक अन्सारी याच्यावर यापूर्वी चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती
अंधेरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची उल्लेखनीय कामगिरी
दुकान आणि आस्थापनांवरील नामफलक मराठीत ठळकपणे लावण्यात अपयशी ठरलेल्या आस्थापनांवर दुसऱ्या टप्प्यात पुढील ठोस कारवाई करण्याबाबत चर्चा करण्यासाठी BMC कायदा समितीच्या अध्यक्षांनी १३ ऑगस्ट रोजी बैठक बोलावली आहे...
या बैठकीला उपायुक्त (विशेष) तसेच परवाना विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकान व आस्थापनांवर पुढील कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा होणार आहे
तसेच नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परवाना विभागाकडे उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांवरही चर्चा केली जाणार आहे.
राज्यातील 08 शासकीय रुग्णालयातील MRI व 40 रुग्णालयातील CT स्कॅन सेंटर कालपासून बंद.
शासकीय रुग्णालयातील MRI व CT स्कॅन सेवा बंद पडल्याने गरीब रुग्णांचे होणार हाल.
MRI व CT स्कॅन सेवा पुरविणाऱ्या Krsnaa Diagnostics या कंपनीचे सरकारकडे 80 कोटी रुपये थकल्याने कंपनीने आपले आठ एम आर आय व 40 सिटी स्कॅन सेंटर गेल्या 24 तासांपासून केले बंद.
वारंवार पत्रव्यवहार करूनही शासनाने थकीत रक्कम न दिल्याने कंपनीने राज्यातील शासकीय रुग्णालयातील एमआरआय व सिटीस्कॅन सेंटर केले बंद.
राज्यभरातील 40 सिटीस्कॅन सेंटर व 08 एम आर आय सेंटर बंद पडल्याने गरीब रुग्णांना बसणार आहे फटका.
अकोल्यातल्या महान गांवात आदिवासी दिनानिमित्त आयोजित भव्य मिरवणूकीच्या वादादरम्यान एका PSI सह एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. या प्रकरणात अकोला पोलिसांनी 20 जणांना अटक केलीय. महान येथे मिरवणूकीतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका PSI आणि पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होतीक्ष. जागतिक आदिवासी दिनानिमित्य मिरवणुकीत हजारो संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होतेय. मिरवणूक सुरू असताना अंतर्गत वाद झाला. हाच वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मिरवणुकीतील काही जणांनी हात उगारलाय. यावेळी पोलिसांच्या मागे मिरवणूकीतील लोकांना पाठलाग केलाय. याचेच हे VIDEO आणि CCTV समोर आले होते. या प्रकरणात अकोला पोलिसांनी आता वीस लोकांना ताब्यात घेतले आहे.
दिया जिल्ह्यातील बेरडीपार येथील स्मशानघाट परिसरात एका 40 वर्षीय इसमाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मोहम्मद इक्बाल शाह फकीर (40) असे मृतकाचे नाव आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून दारू पाजण्याच्या बहाण्याने नेऊन गळ्यावर व पाठीवर चाकूने वार करून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी 3 विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. 9 ऑगस्ट रोजी गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेरडीपार स्मशानघाट परिसरात फकीरटोली काचेवाणी येथील रहिवासी मोहम्मद इक्बाल शाह फकीर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. मृतकाची पत्नी नुरी इक्बाल फकीर (वय 40) यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात गंगाझरीचे ठाणेदार धीरज राजूरकर व पोलिस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी काचेवाणी व गोंडीटोला (कुडवा) येथील 3 विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. चौकशीदरम्यान तिघांनी जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचे कबूल केले. त्यांनी मोहम्मद इक्बाल यांना दारू पिण्याच्या बहाण्याने बेरडीपार स्मशान घाटात नेले आणि तेथे चाकूने वार करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली.
मध्यरात्रीच्या सुमारास भंडाऱ्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर झाल्याची घटना घडली. नागपूर - भंडारा महामार्गावरील बोरगाव येथे झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. तर, दुसरा अपघात भंडारा - पवनी महामार्गावरील गिरोला बस स्टॉपजवळ झालेल्या अपघातात अर्टिका कार नं दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघं गंभीर जखमी झाले. जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपिठाच्या रुग्णवाहिकेनं गंभीर जखमी दोघांनाही तातडीनं भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. गजानन शेंडे (३८) आणि दुधराम खराबे (७०) असं गंभीर जखमी दोघांचं नाव असून बोरगाव इथं झालेल्या अपघातातील मृताचं नावं कळू शकल नाही.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आजच्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत तरी सुटणार का ?
राज्यमंत्री मंडळाच्या बैठकांपूर्वी शिवसेना मंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीत हा विषय चर्चेचा ठरणार आहे
रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेकडून जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीसोबत आमदारकीची तडजोड केली होती
आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्री पद ठरल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्याबाबतचे आश्वासन शिवसेना आमदारांनी देत, मुख्यमंत्री यांनी महायुतीतील तिढा सोडवला
मात्र ६ महिने उलटले तरी पालकमंत्री पदाबाबत शिवसेना आमदारांना दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही
याबाबत अधिवेशन काळात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात बैठक झाली होती,
त्यावेळी अधिवेशनानंतर पालकमंत्री पदाची घोषणा केली जाईल असे आश्वासन दिल्याचा माहिती सूत्रांद्वारे मिळाली होती. मात्र त्यालाही आता महिना उलटला.
मागील अडीच वर्ष उलटले तरी रिक्त असलेले हे पद आता तरी भरले जाणार का ?, १५ ऑगस्ट रोजी भरत गोगावले स्वतंत्र दिवसाचा झेंडा फडकवणार का ? की पालकमंत्री पद हाही चुनावी जुमला होता असा सवाल उपस्थित होतं आहे
असे झाल्यास महायुती मिठाचा खडा पडू शकतो, या पूर्वीच पालकमंत्री पद न मिळाल्यास वेळ पडली तर रस्त्यावरच लढाई लढण्याचा इशाराही महेंद्र थोरवेंनी दिला होता
त्यामुळे आजच्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीनंतर तरी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाची घोषणा केली जाते का ? याकडे शिवसेना आमदारांचे लक्ष लागून राहिले आहे
नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीची घरवापसी अंतिम टप्प्यात
उच्चस्तरीय समिती, सेंट्रल झू प्राधिकरण आणि वन विभागाच्या प्रतिनिधींकडून माधुरीच्या सुख सुविधांची पाहणी
माधुरी हत्तीनीचे निवासस्थान, उपचार केंद्र, स्विमिंग पूल, चाऱ्याची व्यवस्था याची पाहणी केली पथकाने
पाहणी करण्यासाठी आलेले पथक उच्चस्तरीय समितीकडे देणार आपला अहवाल
उच्चस्तरीय समितीकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर माधुरीच्या घरवाक्षेची होणार प्रक्रिया सुरू
तळकोकणात पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा चौकुळ जवळील कुंभवडे गावातील बाबा धबधबा वाहतूक कोंडी, पर्यटकांची मुजोरी आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे स्थानकाची पर्यटकांसाठी बाबा धबधबा बंद केला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेल्या केगदवाडीच्या पोलीस पाटलांवर पर्यटकांनी हत्यार उचलण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली. त्यानंतर स्थानिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला. त्यामुळे बाबा धबधबा खाजगी मालमत्तेत असल्याने त्या जागा मालकाशी चर्चा करून बाबा धबधबा बंद ठेवण्याची मागणी केली. स्थानिकांची भूमिका आणि निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन आता बाबा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे. यावर प्रशासनाने पर्यटकांच्या मुजोरीवर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी म्हटलं आहे.
अंतराळ... नासा... रॉकेट... आणि अवकाश संशोधनाची दुनिया... हे शब्द पुस्तकांमध्ये वाचणाऱ्या धाराशिवच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी निर्माण झाली आहे. अंतराळ विज्ञानाची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी जिल्ह्यातील 183 बालवैज्ञानिकांची जिल्हास्तरीय परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेतून निवड होणाऱ्या 20 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील जगप्रसिद्ध नासा अंतराळ संशोधन केंद्राची अभ्यास सहल घडवली जाणार आहे. त्यासाठीचा हवाई खर्च जिल्हा परिषदेमार्फत केला जाणार आहे. मात्र, ही संधी काही मोजक्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न राहता प्रत्येक तालुक्यातून किमान तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांनाही नासाची सफर घडवावी, त्यासाठी जिल्हा परिषदेसोबत शिक्षकाचा कोविड फंड, तसेच काही दानशूर पुढे यावं अशी मागणी शिक्षक आणि पालकांकडून करण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगर परिसरात मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे लोकल ट्रेनच्या सेवेवर परिणाम झाला आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनची सेवा अद्याप सुरळीत. मुंब्रा, महापे, ऐरोली परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल