मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाट असेल. सरासरी कमाल तापमानापेक्षा 4.6 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीतही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भातही आज अकोला, बुलढाणा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


14 मार्चनंतर विदर्भात सूर्यनारायण तापला असून अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. 23 मार्च ते 28 मार्चपर्यंत अकोल्यातील तापमान सर्वाधिक असल्याची नोंद भारतीय हवामान खात्याने केली आहे. वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात मागील काही दिवसात सर्वाधिक तापमान आहे. तर राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात मोठे बदल होणार असून अनेक जिल्ह्यात उष्मघाताची शक्यता आहे.


सूर्याचा 'यूव्ही इंडेक्स' धोक्याच्या पातळीवर पोहोचला असून अतिनील किरणांमुळे पुढील चार दिवस भर दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. अतिनील किरणं तीव्र झाल्याने मार्च महिन्यात सलग दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे.


अकोल्यात सर्वाधिक तापमान
हवामान विभागाने पुढचे चार दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान असणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्याने सलग दुसऱ्या दिवशी जगभरातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. रविवारी (27 मार्च) अकोला या यादीत नवव्या क्रमांकावर होता तर सोमवारी (28 मार्च) आठव्या क्रमांकावर होता. मार्च महिन्यातच अकोल्यातील सर्वाधिक तापमान जाणवत आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुपारच्या वेळेत रस्त्यावरील नागरिकांची संख्या कमी झाली आहे. आवश्यक काम असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावं असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. 


अकोल्याचं गेल्या आठवडाभरातील तापमान
 
21 मार्च - 41.07 अंश सेल्सिअस
22 मार्च - 41.04 अंश सेल्सिअस
23 मार्च - 41.06 अंश सेल्सिअस
24 मार्च - 42.08 अंश सेल्सिअस
25 मार्च - 42.06 अंश सेल्सिअस
26 मार्च - 42.08 अंश सेल्सिअस
27 मार्च - 42.03 अंश सेल्सिअस
28 मार्च - 42 .09 अंश सेल्सिअस