जालना :  आरोग्य विभागातील पद भरती जाहीर झाली असली तरी 2018 मधील मधील वेटिंगमधील नोकरभरती आता तीन वर्षांनंतर नियमात आणि कायद्यात बसत नसल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाजप काळातील रखडलेल्या आरोग्य विभागातील पदभरतीबाबत असमर्थता दर्शवलीय. दरम्यान 2018 मधील वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांनी पुन्हा या परीक्षेत सहभागी व्हावे अशी विनंती राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान या काळात जाहीर झालेली पदभरतीची प्रक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही झाल्यानंतर लगेचच  4 दिवसाच्या आत सुरू होईल असेही ते म्हणालेत.


2018-19 मध्ये आरोग्य विभागाची मोठी जाहिरात काढण्यात आली होती. अनेक मुलांनी अनेक पदांसाठी अर्ज भरले. फेब्रुवारी महिन्यात परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी निवड प्रक्रिया सुरु झाली त्यावेळी मात्र शासनाने आत्ता केवळ आम्ही 50 टक्के लोकांना घेत आहोत. उरलेल्या 50 टक्के मुलांना आम्ही एप्रिल मे महिन्यात घेऊ असं  जाहीर केलं. विशेष बाब म्हणजे यातील अनेक मुलं ही मेरिटमध्ये आलेली आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती कोरोगानामुळे सध्या योग्य नसल्यामुळे आम्ही तुम्हाला सध्या नियुक्त्या देत नाही असं सांगण्यात आलं परंतु आता जवळपास वर्ष उलटून देखील काहीच घडलं नाही. 


Recruitment : राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती होणार: आरोग्यमंत्री राजेश टोपे


मागील 3 वर्षात कोणतीही जाहिरात निघाली नाही. जी जाहिरात निघाली त्यातील मेरिटमध्ये आलेल्या मुलांपैकी केवळ 50 टक्के मुलांना नोकरी देण्यात आली. आता उर्वरीत 50 टक्के मुलं आशेने आरोग्य विभागाकडे पाहत होते परंतु आता पुन्हा एकदा राजेश टोपे यांनी जाहिरात काढून नव्याने भरती प्रक्रिया राबवणार असल्याची घोषणा केलीय त्यामुळे जी मुले मेरिटमध्ये येऊन देखील केवळ नियुक्ती पत्र मिळालेले नाहीत त्यांनी आता आम्ही मेरिटमध्ये येऊन देखील काय उपयोग झाला असा सवाल उपस्थित केलाय. यातील अशीही काही उदाहरणं आहेत जे परीक्षेत मेरिटमध्ये आलेत परंतु आता नव्याने परीक्षा देणार असतील तर त्यांची वयोमर्योदेची अट त्यांनी ओलंडलीय


आता राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट आहे, रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ही भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून हे भरतीचे लवकरच आदेश निघतील अशी माहिती आहे.


या आधी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. पण राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी अशी मागणी केली होती. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन राज्यातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील अशी आरोग्य विभागाने मागणी केली होती. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्यातील आरोग्य विभागातील अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे.