Maharashtra Election : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election 2023) नव्या कारभारींची निवड करण्यासाठी आज मतदान पार पडले. आरोप-प्रत्यारोपाच्या तुरळक घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोध पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यातही पवारांचे गाव असलेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी आज मतदान झाले. अजित पवार गटाचे पॅनल आणि भाजपच्या पॅनलविरोधात थेट लढत आहे. उद्या, सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
अजित पवार गट आणि भाजपचा एकमेकांवर पैसे वाटल्याचा आरोप
बारामती काटेवाडीत अजित पवार गट आणि भाजप यांच्यात काटे की टक्कर आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच भाजपने अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. तर अजित पवार गटाकडून हे आरोप थेट फेटाळून लावण्यात येत आहे. गावातील विकासाच्या मुद्द्यावरदेखील एकमेकांवर निशाणा साधणं सुरु आहे. काटेवाडीत अजित पवारांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे.
वर्धामध्ये मतदान केंद्राबाहेर धक्काबुक्की
वर्धा जिल्ह्यातील काकडदरा येथे मतदान केंद्राच्या बाहेर धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगाव श्यामजी पंत येथे ही घटना घडली. तळेगांव येथील काकडदरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाहेर दोन गटात धक्काबुकी झाली. मतदान केंद्रावर झालेल्या राड्याची पोलिसांनी दखल घेतली. मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत उभे राहू नये या कारणावरून दोन गटात वाद झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मतदाराच्या चिठ्ठीवर उमेदवाराचे चिन्ह असल्याने मांडळ येथे दोन गटात वाद
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मांडळ या ठिकाणी दोन गटात वाद झाला. मतदाराच्या चिठ्ठीवर उमेदवाराचे चिन्ह असल्याने दुसऱ्या गटातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने दोन गट समोरासमोर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला असून शांततेत मतदान सुरू
अहमदनगर जिल्ह्यात 178 ग्रामपंचायतीसाठी मतदान
अहमदनगर जिल्ह्यात 178 ग्रामपंचायतसाठी आज मतदान पार पडलं...सर्वच 732 मतदान केंद्रावर शांततेत आणि सुरळीत पद्धतीने हे मतदान झाले आहे असून 1701 सदस्य पदासाठीच्या 3995 उमेदवारांचे आणि सरपंच पदाच्या 610 उमेदवारांचेही भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे...अहमदनगर जिल्ह्यातील मंत्री राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, राम शिंदे, रोहित पवार, निलेश लंके, मोनिका राजळे यांच्यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे..
नक्षल भागातही मतदानाचा उत्साह
गोंदियातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात नक्षलग्रस्त भागातही मतदारांचा उत्साह दिसून आला. येरंडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 88 टक्के मतदान झाले. गोंदियातील अन्य तीन ठिकाणीही शांततेत मतदान पार पडले.
नागपूर जिल्ह्यात 357 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक
जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 5 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका आज पार पाडल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात 100 ग्रामपंचायतींसाठी मतदान
पालघर जिल्ह्यात आज 100 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून यामध्ये 51 सार्वत्रिक तर 49 ग्रामपंचायतींमध्ये पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. 628 जागांसाठी तब्बल 2099 इतके उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील टेंभी खोडावे ही ग्रामपंचायत सरपंचासह बिनविरोध झाली आहे.
बुलढाण्यात 48 ग्रामपंचायतीसाठी मतदान
बुलढाण्यात 48 ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान पार पडले. सरपंच पदासाठी थेट मतदान असल्याने चुरस वाढली असून आमदार संजय रायमुलकर, आमदार श्वेता महाले , आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेंद्र शिंगणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.