मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठांनी ठरवलेल्या सूत्रानुसार अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार असल्याचंही ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे.


दरम्यान व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या असल्या तरी शिखर संस्थाची अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची राज्याला परवानगी मिळावी, यासाठी शिखर संस्थांना निर्देश देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.


एआयईसीटीई, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आणि नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीलाही राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश द्यावी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.




 

याआधी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून एमडी/एमएस या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. तसंच ही परीक्षा डिसेंबर 2020 पर्यंत तहकूब करण्याची विनंतीही राज्य सरकारने मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाला केली आहे.