Assistant Professor Vacancies in Maharashtra : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे. अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या (Assistant Professor) मोठ्या भरतीला राज्य सरकारने मंजुरी दिली असून तब्बल 5012 पदे भरली जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभेत केली. 

तब्बल 5012 पदं भरणार, चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा (Assistant Professor Vacancies in Maharashtra)

2026-27 च्या अर्थसंकल्पातील अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याच्या धोरणात बदल करणे सध्या शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विद्यमान अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करून शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर भर दिला जाणार आहे.

माहितीनुसार, राज्यातील सुमारे 1200 अनुदानित महाविद्यालयांमध्ये 5400 प्राध्यापक पदांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांमध्येही 700 प्राध्यापकांची भरती होणार असून एकूण मिळून 6 हजारांहून अधिक पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.(Maharashtra Govt Announces of 5012 Assistant Professor Vacancies)

अनुदान धोरणाबाबत स्पष्टीकरण

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, 2001 पासून राज्यात नव्या महाविद्यालयांना विना-अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याचे धोरण लागू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या जातात. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना 100% शुल्क माफी, ओबीसी विद्यार्थ्यांना 50% तर मुलींना पूर्ण शुल्क सवलत दिली जाते. या व्यवस्थेमुळे महाविद्यालयांचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी होतो. दरम्यान, 2001 पूर्वी स्थापन झालेल्या 78 महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असला तरी त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

नवीन शैक्षणिक धोरण आणि जाहिरात खर्च

तसेच, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या जाहिरातींच्या खर्चावरून सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2022 पासून महाराष्ट्रात NEP ची अंमलबजावणी वेगाने सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी जाहिराती आवश्यक होत्या. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयांतील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील एकूण 11,918 रिक्त पदांपैकी 5012 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आल्याने राज्यातील उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. (Assistant Professor Vacancies in Maharashtra)

हे ही वाचा -

Donald Trump On Iran Israel America War: ट्रम्पची धमकी वाया, होर्मुजवर कुणाचीही साथ नाही, तावातावाने म्हणाले, मला कुणाची गरज नाही!