Maharashtra Government : महाराष्ट्रात ठाकरे सरकारनं आज आपली दोन वर्ष पूर्ण केली आहेत. अनेक खलबतं, राजकीय नाट्यानंतर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ठाकरे सरकारनं (Thackeray Government) राज्याची धुरा सांभाळली होती. 2019 मध्ये पार पडलेल्या निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2019 निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली. पण निवडणूक निकालांनंतर नाराजीनाट्य सुरु झालं. निवडणुकीच्या निकालांनंतर भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली आणि सत्तेची सर्व गणितं बदलली. तिन पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) राज्यात उदय झाला आणि निवडणूकीत सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला विरोधी पक्षाची भूमिका स्विकारावी लागली. आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेची धुरा सांभाळली.
कोरोनाचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, पूरस्थिती यांसारखी अनेक संकटं राज्यावर चाल करुन आली आणि त्यावेळी ठाकरे सरकारची कसोटी पणाला लागली. विरोधकांचे टीकेचे बाण झेलत तीन पक्षांचं सरकार असलेल्या ठाकरे सरकारनं वेळोवेळी सत्वपरिक्षा पार केली. अनेकदा टीकेची झोडही उठली पण त्यातूनही मार्ग काढत आजपर्यंतचा प्रवास ठाकरे सरकारनं पार पाडला आहे.
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे... उद्धव ठाकरेंनी घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ
आजच्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालं होतं. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिलं होतं. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतली होती. अनेक अडथळ्यांनंतर शिवसेना पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आली आणि ती ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली.
ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यातील वेगवेगळ्या भागांत उत्सव साजरा करणार आहेत. अशातच विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेलं भाजप राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल करणार आहे. दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सरकार आपल्या कामांचा पाढा वाचणार आहे, तर विरोधी पक्ष सरकार कसं अपयशी ठरलं हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात दिसणार आहे. सरकारनं दोन वर्षांत केलेली काम जनतेसमोर मांडण्यासाठी महाविकास आघाडीत समाविष्ठ असलेल्या तिनही पक्षांचे कार्यकर्त्यांकडून लहान-मोठ्या संभांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
288 सदस्य असलेल्या विधानसभा निवडणुकांमधून शिवसेनेचे 56 आमदार, राष्ट्रवादीचे 54 आमदार तर काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले होते. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं सर्वाधिक 105 जागांवर विजय मिळवला होता. पण 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला 26.1 टक्के मत मिळाली होती. तर शिवसेनेच्या खात्यात 16.6 टक्के मतं मिळाली होती. या निवडणुकीत एनसीपीच्या खात्यात 16.9 टक्के मत मिळाली होती. तर काँग्रेसला 16.1 टक्के मतं मिळाली होती. या निवडणुकीत इतर दलांना 14.3 टक्के मतं मिळाली होती.
दरम्यान, महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार बनलं, त्यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांनी मत मांडलं होतं की, हे आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही. तसेच या तिनही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी फारसं जुळणार नाही, असंही मत त्यावेळी व्यक्त केलं जात होतं. पण सत्तेची दोन वर्ष यशस्वीपणे पूर्ण करत ठाकरे सरकारनं अनेक राजकीय विश्लेषकांची मतं खोटी ठरवली आहेत. अनेकदा ठाकरे सरकारमधील नाराजी, मतभेद चव्हाट्यावरही आले. एवढंच नाही तर विरोधकांनीही वेळोवेळी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अनेकदा तो यशस्वी झाल्याचंही पाहायला मिळालं. पण तरिही वेळोवेळी आपसी मतभेद दूर करत, ठाकरे सरकारनं आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.