कोल्हापूर : "संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक आहे. सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढूया. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही," असं आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिलं. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात कोल्हापुरात मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात आरक्षणाबाबत बोलताना सतेज पाटील यांनी हे आश्वासन दिलं.


कोल्हापुरातील या मूक मोर्चात राज्यभरातील मराठा समन्वयक सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसंच कोल्हापुरातील मूक मोर्चाला आमदार, खासदारांनीही उपस्थिती लावली आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापलं मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मांडली. 


Maratha Reservation Protest LIVE : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, कोल्हापुरात आज मूक मोर्चा


सरकार जबाबदारी घेण्यास कमी पडणार नाही : सतेज पाटील
सतेज पाटील म्हणाले की, "संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक आहे. सरकार एक पाऊल पुढे यायला तयार आहे. पुन्हा एकदा भेटून चर्चा करणं गरजेचं आहे. सरकार उद्याच्या उद्या संभाजीराजे यांना वेळ द्यायला तयार आहेत. सरकार आणि संभाजीराजे यांनी चर्चा करुन मार्ग काढूया. हातात हात घालून आपण काम केलं पाहिजे. सरकार जबाबदारी घेण्यास कुठेही कमी पडणार नाही. 


"कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. उच्च न्यायालयात टिकलेला कायदा सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. हे आंदोलन ज्या उद्दिष्टाने सुरु केलं आहे त्या उद्दिष्टापर्यंत जावं, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. तसंत सरकारने काही केलं नाही हे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. जे आधीचे वकील होते तेच मुद्दा मांडत होते, मात्र कोर्टाचा निर्णय विरोधात आला, असा टोला सतेज पाटील यांनी भाजपला लगावला.


वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू : हसन मुश्रीफ
"मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन वेळा आंदोलन केलं. पण आरक्षण कोर्टात टिकलं नाही. नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणं ही आमची चूक होती," असं राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. कायदा व्यवस्थित असता तर तो टिकला असता ना, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भापवर निशाणाही साधला. तसेच सारथी, नियुक्ती पत्र असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज देणं असेल हे सगळे प्रश्न आम्ही पूर्ण करणार आहोत. वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही देखील हसन मुश्रीफ यांनी दिली. 


पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं : शाहू महाराज
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी वक्त केली. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे. आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटना दुरुस्त्या केल्या मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे."