मुंबई: संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.


एकनाथ शिंदे म्हणाले की, "या संबंधी भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिलं. हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहे. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. "


एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्याचा विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास हा अजेंडा म्हणून आम्ही पुढे निघालो आहोत. एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही जात आहोत. गेल्या काही काळांमध्ये आम्ही उद्धव ठाकरेंना आमच्या मतदारसंघातील अडचणींची माहिती दिली, त्यामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी केली. पुढच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणे याचाही विचार आम्ही केला. राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक गोष्टी होत्या, महाविकास आघाडीमध्ये त्यावर निर्णय घेता येत नव्हते. पक्षाचे 50 आमदार ज्यावेळी वेगळी भूमिका घेतात, त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज होती." 


बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन 50 आमदारानी वेगळी भूमिका घेतली, त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. हे सरकार लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास कटीबद्ध आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील."