मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) अनेक मंत्र्यांनी दुष्काळ पाहणी दौरा केला असून मराठवाड्यासह, विदर्भात पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती ओढवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या अहवालानुसार ट्रीगर 1 परिस्थिती असलेल्या राज्यातील 256 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, येथील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काही सोयी-सुविधा देण्यात येत आहेत. एकीकडे राज्य सरकारने दुष्काळ (Drought) जाहीर केला असला तरीही महाराष्ट्रातील सुमारे दोन-तृतीयांश भूभाग दुष्काळाने प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. त्याच, पार्श्वभूमीवर केंद्राचे पथकही दुष्काळ पाहणीसाठी महाराष्ट्रात येत आहे.
दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठविण्यात येणार असून, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतील पुसा येथील राष्ट्रीय कृषी संमेलन–रब्बी अभियान 2026 च्या उद्घाटन सत्रात दिली. 3 ऑक्टोबर नंतर केंद्रीय पथक महाराष्ट्रात दौरा करणार असल्याचे समजते. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पीक नियोजन हे उपलब्ध पाण्याचा ताळेबंद, जमिनीतील ओलावा आणि सिंचनाची उपलब्धता लक्षात घेऊन करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री चौहान यांनी केले. पाणीटंचाई असलेल्या भागात कमी पाण्यात येणाऱ्या कडधान्ये आणि तेलबिया पिकांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. धान कापणीनंतर रिकाम्या राहणाऱ्या क्षेत्रात हरभरा, मसूर आणि मोहरीसारख्या पिकांची लागवड वाढविण्यावर भर देण्यात आला.
रब्बी हंगामासाठी बियाणे, खते आणि अन्य निविष्ठांचा आगाऊ आराखडा तयार ठेवण्याच्या तसेच शेतकऱ्यांना योग्य वाण आणि पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खतांचा संतुलित वापर करण्यासाठी ‘खेत बचाओ’ अभियान रब्बी हंगामातही राबविण्यात यावे, असे चौहान यांनी सांगितले. तसेच फार्मर आयडी, एग्रीस्टॅक आणि किसान क्रेडिट कार्डचे कव्हरेज वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
राज्यातील कृषीमंत्र्यांसोबत चर्चा
रब्बी हंगामात पेरणीची प्रगती, उगवण, रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारभाव यांचा दर आठवड्याला आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. महाराष्ट्रासह कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीचा केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार असून, 29 सप्टेंबर रोजी सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्यांसोबत होणाऱ्या चर्चेत रब्बी हंगामासाठी समन्वित आणि परिणामाभिमुख कृती आराखडातयार करण्यात येणार आहे.
कोकणातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू
विदर्भ मराठवाड्यासह कोकणातही दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र, रत्नागिरीत तीनच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले असून करपलेल्या भातशेतीकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसून आलं. पावसाअभावी हातची शेती गेल्याने चिपळूणसह इतर तालुक्यांनाही दुष्काळी मदतीची मागणी केली जात आहे. करपलेली भातशेती... डोळ्यांसमोर उभं राहिलेलं नुकसान... आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू! रत्नागिरी जिल्ह्यात केवळ तीन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्याने चिपळूणमधील शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत भातशेती करपली आहे. बियाणे, खत आणि मजुरीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. यंदा सरासरीच्या सुमारे 75 टक्केच पाऊस झाल्याने पुढील काळात पाणीटंचाईचीही चिंता आहे. त्यामुळे चिपळूणसह इतर तालुक्यांचाही दुष्काळी निकषांमध्ये विचार करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
हेही वाचा
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
