मुंबई : राज्यभर उद्या महाराष्ट्र दिन (Maharashtra Din ) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिनानिमीत्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "कितीही अडथळे आणि संकटं येऊ द्या, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकाविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस शुभेच्छा देताना म्हटले आहे.
विविध विषयांवरून राज्यात सध्या वातावरण तापलं आहे. याचाही उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान कुणी करत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. या तीन वर्षातील दोन वर्षे कोरोना विषाणूचे संकट होते. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत शेती, उद्योग आणि गुंतवणुकीत महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले आहे. शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन आणि दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक सहाय्य करून सामाजिक भान ठेवले आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. या काळात महाराष्ट्राने उचललेल्या ठोस पावलांचे देश तसेच जागतिक पातळीवर कौतुक झाले."
मुख्यमंत्री म्हणाले, "स्वार्थ आणि महत्वाकांक्षेपोटी महाराष्ट्रामधील जात धर्मांतील सलोखा संपवून सामाजिक क्रांतीच्या महापुरुषांचे विचार मातीस मिळविण्याची कामगिरी सध्या सुरू आहे. महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा, संयम आणि सारासार विवेकबुद्धीने वागणारे राज्य म्हणून ओळखले जाते. एखाद्या राज्याची प्रगती म्हणजे फक्त किती गुंतवणूक तिथे आली आणि किती रस्ते झाले यावरून ठरत नाही. महाराष्ट्राने पर्यावरणासारख्या मूलभूत आणि संवेदनशील विषयवार जगाचेही लक्ष वेधले आहे. आरोग्याची पुढील काळातली आव्हाने लक्षात घेऊन आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचे नियोजन केले आहे. खेडी, शहरे स्वच्छ असावीत, सर्वांना व्यवस्थित नळाने पाणी मिळावे, सर्वसामान्यांना घरे मिळावीत, शहरांचे आराखडे हे पुढील काही वर्षांच्या विकासाचा अदमास घेऊन तयार करावेत, विकेल तेच पिकेल असे ठरवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, सौर ऊर्जेचा वापर, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक या गोष्टींवर आम्ही केवळ भरच दिलेला नाही तर अंमलबजावणी सुरू केली आहे."
महत्वाच्या बातम्या