Maharashtra Coronavirus Updates : राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. रविवारी राज्यात 902 नव्या कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे. तर 9 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याच कालावधीत राज्यात 767 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, यामध्ये आज किंचीत वाढ झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 97 हजार 500 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या सहा रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 54 इतकी झाली आहे. आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या सहा कोटी 76 लाख 84 हजार 674 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 49 हजार 596 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजे एकूण नमुण्यापैकी राज्यात 9.82 टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 72,982 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 898 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशाची स्थिती -
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7 हजार 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ओमायक्रॉनच्या व्हेरियंटची लागण झालेले 145 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 83 हजार 913 वर पोहोचली आहे. अशातच महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 77 हजार 422 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (शनिवारी) 7469 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 78 हजार 940 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.