मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येचा सलग दुसऱ्या दिवशी विस्फोट झाला आहे. राज्यात आज तब्बल 36 हजार 902 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ पाहता राज्यावर लॉकडाऊनची छाया गडद होताना दिसत आहे. तसे संकेत वारंवार सरकारकडून देण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यभरात रविवार 28 मार्च 2021 पासून रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.


आज नवीन 17 हजार 019 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2300056 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 28 हजार 2451 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.2%झाले आहे.


पुणे जिल्ह्यात परिस्थिती गंभीर 
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 7090 कोरोना रुग्णांची नोंद तर 37 बाधितांचा मृत्यू.  ही आतापर्यंतचा एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक वाढ आहे. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळन्याचे नवनवीन उच्चांक गाठले जातायत. येत्या पाच सहा दिवसात करोना रुग्णांची वाढ कमी न झाल्यास दोन एप्रिलला लॉकडाउनचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच दिलेला असताना आज पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झालीय.


कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता विनाकारण होणारी गर्दी टाळणे, वाढत्या कोरोना संसर्गाला रोखणे यासाठी काही कडक उपाययोजना लागू करण्यावर राज्य शासनानं भर दिला. शिवाय या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.


सदर सूचनेसंबंधीचे स्वतंत्र आदेश शुक्रवारीच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत,मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि इतरही अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.