मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात येताना रोजच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. राज्यात आज 2,692 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 716 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 80 हजार 670 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.28 टक्के आहे. दरम्यान, कोरोना नियंत्रणात आल्याने उद्यापासून शाळा अनलॉक करण्यात येणार आहे.


अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्केपेक्षा जास्त 
राज्यात सध्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 424 नवीन कोरोना संक्रमितांची नोंद झाली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 60 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत, अशा गावात लॉकडाऊन लावणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केलीय. जिल्ह्यात दररोज 500 ते 800 च्या दरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळत असून पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे.


मुंबईत गेल्या 24 तासात 570 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 
मुंबईत गेल्या 24 तासात 570 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 564 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,21,051 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4714 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1187 दिवसांवर गेला आहे. 


पुणे शहरात आज नव्याने 151 कोरोनाबाधित 
पुणे शहरात आज नव्याने 151 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 5 लाख 1 हजार 503 इतकी झाली आहे. शहरातील 169 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 90 हजार 948 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 564 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 33 लाख 90 हजार 305 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 519 रुग्णांपैकी 214 रुग्ण गंभीर तर 188 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 36 इतकी झाली आहे.


गेल्या 24 तासात देशात 23 हजार रुग्णांची भर तर 244 जणांचा मृत्यू
गेल्या दोन दिवसांमध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येनंतर आज त्यामध्ये काहीशी घट झाल्याचं पहायला मिळतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात 22 हजार 842 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 244 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 25 हजार 930 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात 24 हजार 354 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 234 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.