Maharashtra CM Oath Ceremony: अखेर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावर मोहोर उमटवतील. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे. दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपचं बैठकसत्र सुरु झालं असून मुख्यमंत्री, मंत्रीपदावर कोअर कमीटी आणि त्यानंतर होणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय होणार आहे.
दिल्लीतल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय
आज सकाळी १० वाजता महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीची बैठक घेणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. विधीमंडळात सध्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी आमदार रवाना होत आहेत. ११ वाजता भाजपच्या विधानसभा गटाची बैठक असून या बैठकीकरता गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री भाजपचे प्रभारी विजय रुपानी यासाठी आले असल्याचंही बावनकुळे म्हणाले. विधीमंडळ पक्षकार्यालयात कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यात विधीमंडळ पक्षनेता आणि शपथविधी सोहळ्याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि भाजपचे केंद्रीय निरिक्षक विजय रुपानी या बैठकीसाठी काल महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांच्या व इतर आमदारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आझाद मैदानावर उद्या शपथविधी
भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर आज महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून, तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. उद्या (5 नोव्हेंबर) आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री तर अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे. घटकपक्षांना मंत्र्यांच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
शपथविधीची भव्य तयारी
या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले असून. हजारो उपस्थितितांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. उद्याच्या सोहळ्यासाठी शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळेच आझाद मैदानाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.