Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातीलल मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरणात सर्व आरोपींवर मोका (Maharashtra Control of Organised Crime Act (MCOCA) लावण्यात आला आहे. मुख्य आरोपी असल्याचा आरोप होत असलेला खंडणीखोर वाल्मीक कराडवर मोका अजूनही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. वाल्मिकी कराडला खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर अद्याप मकोका लावण्यात आलेला नाही. सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे.


खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चाटेवर खंडणीचा गुन्हाही दाखल आहे. अन्य दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिकी कराड आहेत. दोघेही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वाल्मिक कराडने सीआयडीसमोर शरण आला होता. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. वाल्मिक कराडच्या अटकेपासून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी सातत्याने वाल्मिक कराडची पोलखोल करत गंभीर आरोप केले आहेत.


कराडचा सहभाग आढळला नाही?


संतोष देशमुख प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून अजूनही कृष्णा आंधळे फरार असून बीड पोलिसांसह सीआयडीला त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. दुसरीकडे, वाल्मिक कराडचा गुन्ह्यात सहभाग अजून आढळला नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कराडवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही. खंडणीखोरांना मोका लागल्याने खंडणीखोरांचा म्होरक्या कराडवरही मोका लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतले जाऊ शकते आणि त्यांच्या जागी छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा दरम्यान होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना होत आला आहे. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून निर्घृण करून हत्या करण्यात आली होती.  


पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली


शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांनी बीडमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. दरम्यान, 7 जानेवारीला पीडितेच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.


वाल्मीक कराडवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे 


दरम्यान, वाल्मीक कराड मुख्य आरोपी असल्याचं आणि सर्वात जास्त आरोप असल्याचं सध्या चित्र समोर येतं आहे. मुख्य मास्टरमाईंड तो असल्यानं त्याच्यावर 302 हा गुन्हा नोंद व्हायला पाहिजे, मुख्य आरोपी कराड असल्याचं पोलीस तपासात समोर येत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. कराडला वगळून सर्वांवर मोकाची कारवाई करण्यात आल्यानं त्याला भाजप पाठीशी घालतंय का? असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या