मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला असताना राज्याराज्यांमध्येही लसीकरणाला शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला. यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत असं म्हणत त्यांनी एका नव्या आणि सकारात्मक उर्जेनं जनतेला संबोधित केलं.


कोरोना काळात सुरुवातीच्या दिवसांमध्ये या संसर्गानं ज्या प्रकारे थैमान घातलं होतं, ते दिवस आठवताना या दिवसांमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रत्येक कोविड योद्ध्याला मुख्यमंत्र्यांनी मानाचा मुजरा केला. कोरोना काळात मोलाचं सहकार्य देणाऱ्या टास्क फोर्स टीममधील डॉक्टरांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधार, म्हणून केला.


सावधगिरीमध्ये हलगर्जीपणा नको... 


कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये परिस्थिती किती बिकट होती, हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी लसीचा शुभारंभ झाल्याचा आनंद वयक्त केला. यावेळी संकट अजूनही टळलेलं नाही, असं म्हणत त्यांनी जनतेला सावधगिरीचा इशारा दिला. सध्या आपल्या हाताशी लस आली असली तरीही ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस आणि महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्याचा प्रभावही किती दिवसांसाठी राहणार हेसुद्धा येत्या दिवसांतच स्पष्ट होणार असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी सर्वांपुढे स्पष्टपणे मांडला.


'उत्तम लस म्हणजे तोंडावरील मास्क'


कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस मिळाली असली तरीही सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावर असणारा मास्क, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मास्कचं महत्त्वं पुन्हा एकदा पटवून देत मास्कला अंतर देणं योग्य नसल्याचं सांगितलं. पंतप्रधानांनी ज्याप्रमाणं लसीच्या वापरानंतरही मास्कच्या वापरावर भर दिला, त्याचप्रमाणं मुख्यमंत्र्यांनीही कोरोनाचं संकट टाळण्यासाठी मास्कच्या वापराला प्राधान्य दिलं.


कोरोना सेंटरमध्ये सध्या जाणाऱ्यां रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, हे चित्र असंच राहो अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काही सुविधांचा उपयोग न होणं हे जास्त चांगलं आहे, असं म्हणत आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिवाय कोरोनाचा नायनाट होईपर्यंत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सुचनांचं पालन करण्यात यावं, आवाहन त्यांनी जनतेला केलं.