मुंबई : महाराष्ट्रातील सत्तापेच सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महूर्त सापडला. महाविकास आघाडीतील 26 आमदारांनी कॅबिनेट तर 10 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, अद्याप खातेवाटप झालेला नाही. अशातच ठाकरे सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिनही पक्षांच्या नेत्यांमध्ये धुसपूस सुरू झाल्याचे पाहायला मिळते. सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यानंतर आता तिनही पक्षांच्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील वृत्त सामनाने दिलं आहे.


तिनही पक्षांकडून मलईदार खात्यांसाठी चढाओढ सुरू असल्याचेही पाहायला मिळत आहे. अशातच खातेवाटपादरम्यान, महसूल खातं हे काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. हे खातं आपल्याला मिळावं यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीकडे कृषी मंत्रीपदही मिळावं अशी मागणी केली आहे. महसूल आणि कृषी अशी दोन खाती मिळाली तर त्यापैकी एक खातं बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवलं जाईल, तर दुसरं खातं अशोक चव्हाणांच्या पदरात पडेल. दरम्यान, महसूल खातं न मिळाल्यास अशोक चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम खातं आपल्याकडे हवं असल्याचीही चर्चा आहे. मात्र नितिन राऊतांकडे असलेलं हे खातं आपल्याला मिळावं अशी विजय वडेट्टीवार यांचीही इच्छा असल्याचे बोलंलं जातं आहे.


सध्या कृषी खातं शिवसेनेकडे आहे. थोरात आणि चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरु असताना काँग्रेस हायकमांड कोणाच्या डोक्यावर हात ठेवणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला आलेलं कृषी खातं काँग्रेसला मिळावं, अशी इच्छा देखील थोरातांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांनी मंगळवारी दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधींची भेट घेतली होती. काँग्रेसच्या विचारसरणीशी तडजोड होता कामा नये, असा सल्ला सोनिया गांधी यांनी नव्या मंत्र्यांना तसेच आमदारांना दिला होता. दरम्यान आधी गृहखातं शिवसेनेकडे होतं. पण आता ते राष्ट्रावदीच्या पारड्यात पडणार आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादीला गृहखातं मिळणार असेल तर राष्ट्रवादीच्या गोटातील ग्रामविकास किंवा ग्रामिण भागाशी निगडीत खातं काँग्रेसला देण्यात यावं यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.


पाहा व्हिडीओ : भाजपच्या षडयंत्रापासून सावध राहा : उद्धव ठाकरे



राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही खाते वाटपावरून धुसपूस


शिवसेनेच्या पारड्यात असलेलं गृह खातं आता आता राष्ट्रवादीकडे असणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाव्य खातेवाटप केलं आहे. त्यानुसार, अजित पवारांकडे अर्थ खात जाणार आहे. त्यामुळे निदान गृह खातं आपल्याला मिळावं अशी दिलीप वळसे पाटलांची इच्छा आहे. मात्र आता गृह खातं अनिल देशमुखांकडे जाणार असल्याचं समजत आहे. एवढचं नाहीतर माजी आमदार पंकजा मुंडे यांचा पराभव करून परळी मतदारसंघातून निवडून आलेल्या धनजंय मुंडे यांना सामाजिक न्याय खातं हे मिळणार आहे. पण त्यांना हे खातं नको असून आरोग्य किंवा जलसंपदा खातं पाहिजे आहे. छनग भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं मिळणार आहे. पण तेदेखील या खात्यामुळे फारसे खूश नसून त्यांना नवाब मल्लिकांना मिळणार असलेलं उत्पादन शुल्क खातं पाहिजे आहे.


शिवसेनेचा खातेवाट


आमदार आदित्य ठाकरेंनी याआधी पर्यावरण विषयी अनेक गोष्टींचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या पारड्यात महत्त्वाचं पर्यावरण खातं जाणार असल्याची चर्चा आहे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश नसल्याने ते नाराज असल्याचं वृत्त पसरलं होतं. पण मी कडवट शिवसैनिक आहे, नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं सांगत त्यांनी पक्षावर नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच कृषी खातं गुलाबराव पाटील किंवा दादा भुसे यांना सोपवलं जाण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या : 


पुणे काँग्रेस भवनची तोडफोड करणारे माझे कार्यकर्ते नाहीत : संग्राम थोपटे


Shivsena | मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत असंतोष, डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा