मुंबई :  राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची (Wine)विक्री करता येणार आहे.  हा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet) बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र सोडलं जात आहे तर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री मात्र या निर्णयाचं समर्थन करत आहेत. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले...
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वाईन आणि दारु यात जमिन आसमानाचा फरक आहे. वेगवेगळ्या फळांपासून वाईन तयार होते.  पण काहींनी जाणीवपूर्वक हे मद्यराष्ट्र होईल असा चुकीचा प्रचार सुरु केलाय. पण मध्य प्रदेशात तर घरपोच दारु पोहोच केली जाते.  वाईन सुपरमार्केटमधे वाईट विकण्याच्या निर्णयाचे मिनिट्स मंत्रीमंडळाच्या पुढच्या बैठकीत नक्की केले जातील आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 


गोपीचंद पडळकरांनी काय म्हटलंय...
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, टक्केवारीसाठी वाईन ही दारू नव्हे असं संशोधन करणाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं 'झिंग झिंग झिंगाट'  झालंय. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. 


शरद पवारांनी आयुष्यात खुप सोसलंय
जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही. शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत.


वाईन विक्रीच्या निर्णयावर फडणवीस यांची प्रतिक्रिया
"राज्यात पेट्रोल-डिझेल ऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारूविक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपरमार्केटमधून वाईन विक्री. महाराष्ट्राला मदयराष्ट्र करण्याचा हा प्रकार खपवून घेणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha