Maharashtra Budget Session: सत्ताधारी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षाचं वर्तन हे सभ्यतेचं असावं लागतं. परंतु, प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे, एक प्रकारचा माज आल्यासारखा सत्ताधारी पक्षाचं वर्तन आहे. जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथं लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही अशा ठिकाणी आम्ही चहापणाला जाणार नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला.

महाविकास आघाडीकडून ठाकरे भास्कर जाधव, आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसकडून सतेज पाटील, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली. एवढं बहुमत आणि बहुमताचं सरकार असताना विरोधी पक्ष नेत्याची एवढी भीती का असावी भाजपाला? भाजपाच्या मनात एवढी भीती का आहे? अशी विचारणा महाविकास आघाडीने केली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकही नेता उपस्थित नसल्याने भूवया उंचावल्या आहेत. 

सरकारची भूमिका अत्यंत संदिग्ध

भास्कर जाधव म्हणाले की, अजित दादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका असताना सरकारची भूमिका अत्यंत संदिग्ध आहे. डिजिटल मीटर आहेत, घरगुती वगैरे हे आम्ही जबरदस्तीने लावणार नाही म्हणतात आणि चार दिवसापूर्वीच मी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं की संपूर्ण देशामध्ये हे अशा पद्धतीचे अदानीचे डिजिटल मीटर लावणार हे देशातलं पहिलं एक नंबरच राज्य आहे म्हणून वरती छाती बडवतात, असा टोला लगावला. हे राज्य आता जवळजवळ उडता पंजाब होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे. कारण ड्रग्ज या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकलं जात असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. 

शेतकऱ्यांची लूट चालली

विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांची लूट चालली असून सोयाबीनला 4 हजार रुपयांपलीकडे एक रुपया मिळाला नाही. मका 1500-1600 रुपयाच्या पलीकडे व्यापाऱ्यांनी घेतला नाही महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला सावकारांच्या कर्जामुळं त्याला किडनी विकावी लागते, तो आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे. 9 लाख 32 हजार कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे, लाडक्या बहिणींमुळे हे राज्य कर्जबाजारी होते असं सांगतात. लाडक्या बहिणीच्या नावाने देताय दीड (हजार) आणि कर्जबाजारी झालय म्हणून तुमचे मंत्री सांगतात, हे सगळं जे ढोंग असल्याची टीका त्यांनी केली.

भ्रष्टाचार आणि कमिशनखोरी

कमिशनखोरी महाराष्ट्रामध्ये सरळ सरळ 20-25 टक्क्यांवर जात असेल, टेंडरची किंमत दीडपट वाढवून पुन्हा ते टेंडर प्रकाशित होऊन एका विशिष्ट माणसाला दिलं जातं.  महाराष्ट्रामध्ये बोली लागलेली आहे, तू 15 टक्के देतो काय? चल 22 टक्के फायनल तुला काम मिळालं, अशी स्थिती झाल्याची टीका त्यांनी केली. आज महाराष्ट्रामध्ये अशा 1 लाख 57 हजा महिला आणि मुली लापता आहेत, कुठे आहे महाराष्ट्र? अशी विचारणा त्यांनी केली. 

किंमत काय लागली पाच लाख

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुलुंडमध्ये मेट्रोचं चालू काम असतानाच एक रिक्षा चिरडली गेली, दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. किंमत काय लागली पाच लाख, म्हणजे ही आपल्या आता जीवनाची किंमत आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. शहरी भागात नोकऱ्या नाहीत, जे कोणी नुसतं चालतात रस्त्यावर, त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चरचं वजन पडतं आणि खालती चिरडले जातात, मग नेमकं हे राज्य चाललंय तरी कोणासाठी आणि कशासाठी? अशी विचारणा त्यांनी केली. 

राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी ही धाड होती का?

सतेज पाटील म्हणाले की, 2025 चा आर्थिक इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे, त्यामध्ये 70 लाख युवक आणि युवतींनी बेरोजगार म्हणून नोंद ऑनलाईन रजिस्टरमध्ये केली आहे.गरज नसलेला महामार्गाची 86 हजार कोटींची व्हॅल्यू आज 1 लाख 2 हजार कोटींवर गेली आहे. 12 जिल्ह्यांमध्ये शक्तिपीठ महामार्गाला विरोध असल्याचे ते म्हणाले. मंत्रालयात एसीबी धाड घालते, हे वरचं अप्रूव्हल असल्याशिवाय शक्य नाही. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी ही धाड होती का? असा सवाल त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या