Maharashtra Budget Session 2023 : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2023) सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज (17 मार्च) शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशीही विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावरुन विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आजही आंदोलन सुरु केलं आहे. 'खोके सरकारचा उपयोग काय शेतकऱ्यांना न्याय नाय' अशा घोषणा विरोधक देत आहेत.


अवकाळीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका


अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे. यासंदर्भात विधानसभेत अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. आजही विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली. दरम्यान, कालही विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर विरोधकांनी प्रतिकात्मक चूल बनवत गॅस दरवाढ, शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच बजेट म्हणजे फसवणूक अशा घोषणा देत निदर्शने केली होती. 


नांदेड जिल्ह्यात अवकाळीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान


नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड तालुक्यात सायंकाळी जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बारड येथे घर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव, चनापूर, पाटणूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. केळीच्या बागांना मोठा फटाका बसला. वीजवितरण कंपनीचे विद्युत खांब, तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. हरभरा, गहू आंबा आदी पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मुदखेड तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नांदेड-मुदखेड मार्गावर काही ठिकाणी झाडे पडली आहेत. हदगाव तालुक्यालाही वादळी पावसाचा तडाखा बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर सोलापूर, हिंगोली, जालना, रयगड या जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस, झाला आहे. या पावसात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना मोठा फटका, बळीराजा चिंतेत