Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट
Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साताऱ्यात चिंचणेर वंदन येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, या पावसामुळे पुराच्या पाण्यात उभी असलेली चार चाकी वाहने जेसीबीच्या मदतीने बाहेर काढली. तर पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
कणकवली आचरा रस्ता वाहतुकीस बंद, मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण
कणकवली आचरा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ कुंभारवाडी मार्गे जावे लागणार आहे. त्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती. त्यासाठी नदीपात्रातून पर्यायी रस्ता काढण्यात आला होता. मात्र गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पाणी जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची माती जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
करूळ घाटातील दरड हटवली, मात्र वाहतूक धिम्या गतीने सुरू
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत असून तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. करुळ घाट गेली दीड वर्षे नूतनीकरणाकरिता बंद होता, त्यानंतर वाहतुकीला खुला करण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. आता ठेकेदाराच्या माध्यमातून दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आले आहे. मात्र ही वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली आहे.























