Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर... 

Continues below advertisement

Mankhurd Chawl Collapse : धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता हाहाकार माजवला असून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 6 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली असून मानखुर्द परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखीही काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

Continues below advertisement

Raigad Rain Update : पालीचा अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले, मुख्य सभागृहात पहिल्यांदाच पाणीच पाणी

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले ओसंडून वाहत असून सखल भागात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच रायगडमधून एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील ऐतिहासिक श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या (Pali Ballaleshwar Temple) मुख्य मंदिरात पुराचं पाणी शिरले आहे. गेल्या काही तासांत झालेल्या ढगफुटीसदृश आणि अतीमुसळधार पावसामुळे पाली शहरासह मंदिर परिसराला पुराच्या पाण्यानं वेढलं आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील मुख्य सभागृहात (Pali Ballaleshwar Temple Sabhagruh) पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पाहायला मिळत असून, यामुळे स्थानिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.