Maharashtra BJP : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या दमदार यशानंतर आता भाजपच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये सुद्धा मोठा फेरबदल केला जाणार आहे. येत्या दोन महिन्यामध्ये प्रदेश भाजपमध्ये भाकरी परतवले जाणार असून प्रदेशाध्यक्ष निवडीसह तब्बल 78 जिल्हाप्रमुख निवडले जाणार आहेत. त्याचबरोबर नवी प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी मुहूर्त ठरला असून मार्च महिन्यामध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष निवडले जाणार आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा निवडणुकीवर निवडून आल्यानंतर त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा निवडला जाणार आहे. 


भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित


दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आलं असून त्यांच्या नावाची औपचारिकता मार्च महिन्यामध्ये केली जाईल. दरम्यान, प्रदेश कार्यकारणीमध्ये बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष निवड केली जाणार आहे. दरम्यान, या महिन्यामध्ये भाजपकडून सदस्य नोंदणी सुरुवात करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये बुथ प्रमुख तालुका प्रमुख व जिल्हाध्यक्ष निवडी होणार आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड मार्च महिन्यामध्ये पार पडली जाईल. 


कशी असेल भाजपची निवड प्रक्रिया? 



  • 1 ते 20 जानेवारी पर्यंत भाजप राबवणार सदस्य नोंदणी अभियान

  • 20 ते 28 जानेवारी दरम्यान तब्बल ५ लाख अॅक्टीव्ह सदस्य तयार करणार

  • 1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान १ लाख बुथ प्रमुखांची निवड केली जाणारॉ

  • भाजपकडून 10 ते 20 फेब्रुवारी दरम्यान राज्यात 78 तालुका प्रमुखांची निवड केली जाणार

  • 20 ते 28 फेब्रुवारी दरम्यान 78 जिल्हा प्रमुख ही निवडले जाणार

  • 15 मार्चपर्यंत भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष


भाजपचे संघटन पर्व नेमकं काय आहे?


भाजपचा विस्तार आणि 2029 मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडून नव्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाची मूळ संघटना आणि इतर मोर्चा आणि पक्षातील सेलला पक्षाच्या वाढीसाठी सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले असून महिला मोर्चा युवा मोर्चा ओबीसी मोर्चा या मुख्य मोर्चांसह इतर सेल व आघाड्यांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्याचं लक्ष देण्यात आले. 1 जानेवारी ते 15 जानेवारी यादरम्यान होणाऱ्या संघटन पर्व या अभियानाच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना भाजपसोबत जोडण्याचं टार्गेट ठेवण्यात आले आहे. या दृष्टीने भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर संघटन पर्वाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून चव्हाण यांनी या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या