मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्युरिटी रिव्ह्यू मिटींग झाली. ही मिटींग दर एक ते दोन महिन्यांमध्ये होते. कोविड काळात पोलिसांवर खूप ताण आलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचा नेत्यांचा सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.


सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकार नेत्यांची सुरक्षा कमी करतंय : राम कदम


ठाकरे सरकारनं घेतलेला हा निर्णय सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकार नेत्यांची सुरक्षा कमी करत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येत असल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदम म्हणाले की, "गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सरकारला आलेलं अपयश दाखवून दिलं. ना हे शेतकऱ्यांना मदत करु शकले, ना कोरोना काळातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही मदत करु शकले. ज्या कोकणानं शिवसेनेला भरभरुन दिलं त्या कोकणात आलेल्या चक्रीवादळानंतरही कोणतीही मदत करण्यात आली नाही. त्यामुळे सुडाच्या भावनेतून महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे."





नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सूडबुध्दीच राजकारण : केशव उपाध्ये


"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे. हे सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसलेले असताना सर्वाधिक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले व जनतेला दिलासा दिला. काल ही भंडारा येथे तेच पोहचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सूडबुध्दीच राजकारण."