Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) दणदणीत विजय मिळाला आहे. भाजपच्या या विजयानंतर महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये गुलाल उधळून, फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आलाय. राज्यात धुळे, पुणे, नागपूर, ठाणे, जळगाव, शिर्डी, इंदापूर आणि बीडसह विविध ठिकाणी आनंद साजरा करण्यात आलाय.
धुळ्यात फटाके फोडून आनंद साजरा
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल धुळ्यात भाजपचे गुजरात राज्याचे प्रदेशाध्यक्ष सी. आर पाटील यांचे व्याही सुभाष देवरे आणि मुलगी धरती देवरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. प्रत्येक मुलीसाठी आपले वडील हे हिरो असतात, माझ्या वडिलांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ केला अशी प्रतिक्रिया सी. आर. पाटील यांची कन्या धरती देवरे यांनी दिलीय.
शिर्डीत जल्लोष
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या उपस्थितीत फटाके फोडून जल्लोष केलाय. 2024 च्या निवडणुकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत आजचा जल्लोष साईंच्या नगरीत करायला मिळतो याचा आनंद असल्याचे आमदार राम कदम यांनी म्हटलंय.
इंदापूरमध्ये वाटले पेढे
गुजरातमधील यशाबद्दल इंदापूर तालुक्यातील बावडा येथे भाजप युवा मोर्चाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे भरून आनंद व्यक्त केला. तसेच भारतीय जनता पक्षाचे मन:पूर्वक अभिनंदन केले. बावडा हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे गाव आहे.
ठाण्यात भाजपकार्यालय बाहेर जल्लोष
गुरजातमध्ये भाजपला मिळालेल्या भरघोस यशामुळे ठाण्यात भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला. ठाण्यातील खोपट परिसरातील भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे हा जल्लोष साजरा करण्यात आला. ठाण्यातील आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ढोल ताशे वाजवून एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
जळगावमध्ये मिळाई वाटक
जळगाव जिल्ह्यात देखील विविध ठिकाणी आज जल्लोष पाहायला मिळाला. फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जळगाव शहरातील भाजप कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
जालन्यात पेढे वाटून आनंद साजरा
जालना येथे गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून आपला आनंद साजरा केला. भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि त्यांच्या समर्थकांनी गुजरात विजयाचा जल्लोष केला. पुन्हा एकदा गुजरातमध्ये रेकॉर्ड ब्रेक निर्विवाद वर्चस्व मिळवले असून या विजयाचा सिलसिला इतर राज्यात देखील पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त करत आमदार लोनीकर यांनी आनंदोत्सव साजरा केला
बीडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला मोठ यश मिळाल्यानंतर बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. बीड शहरात असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला असून यावेळी एकमेकांना पेढे भरून आणि फटाके वाजवून या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
नागपूरमध्ये भाजपचा जल्लोष
नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने टिळक पुतळा येथे गुजरातच्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर जल्लोष करण्यात आला. या जल्लोषमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील यावेळी उपस्थित होते. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नृत्य आणि फुगडीच्या माध्यमातून हा विजयी आनंद साजरा केला.
महत्वाच्या बातम्या