बीड : राज्यामध्ये लॉकडाऊन चालू असला तरी बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वीच कडक निर्बंध लादण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हे निर्बंध वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी 5 मे ते 7 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यात अनेक अत्यावश्यक सेवांवरही बंधने घालण्यात आली होती. आज या कडक लॉकडाऊनचा अंतिम दिवस होता. मात्र, हे कडक लॉकडाऊन 12 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.


काय आहेत नवीन आदेश?



  • शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार (दिनांक 8, 9, 10, 11 आणि 12 मे) या दिवशी केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. सर्व औषधालये (Medical) रुग्णालये, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.

  • जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना किराणा दुकाने, चिकन, मटन विक्रीचे दुकाने, बेकरी व कृषीशी संबंधित इ. पूर्णतः बंद राहतील. 

  • गॅस वितरण दिवसभर सुरु राहील.

  • प्रत्येक दिवशी केवळ पायी/गाडीवर/हातगाड्यावर फिरुन दुध, भाजी व फळांची विक्री केवळ सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत व फक्त फळांची विक्री सायकांळी 5 ते रात्री 7 या वेळेत करता येईल.

  • बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते दु.12 वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील. पेट्रोलपंप व गॅस एजन्सी यांना कंपनीस देयके द्यावी लागतात तसेच पेट्रोलपंपावर रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. करिता पेट्रोल पंप व गॅस एजन्सी यांना सदर वेळेत बँकेत जाऊन कामकाज करता येईल.

  • सर्व अधिकारी/कर्मचारी जे कोरोना विषयक कामकाज करत आहेत (उदा. डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य विभागाचे महसूल विभागाचे पोलीस विभागाचे जिल्हा परिषदेचे इ. अधिकारी/ कर्मचारी) ज्यांचेकडे संबंधीत कार्यालय प्रमुखाने दिलेले ओळखपत्र असेल त्यांनाच कार्यालयात ये-जा करण्याची मुभा असेल.

  • या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येतील.