मुंबई : महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच, राजकीय पक्षांना कुठलाही बंद पुकारता येत नाही, असे निर्देश देत उद्याचा बंद मागे घेण्याचेही न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या उद्याच्या बंदबाबत भूमिका जाहीर करत आपण हा बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. शरद पवार यांच्याकडून उद्या सकाळी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून सकाळी 10 ते 11  या वेळेत सहवेदना व्यक्त करण्यात येणार आहेत. येथे एक तास बसून बदलापूर घटनेचा निषेध नोंदविण्यात येईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बंदबाबत भूमिका जाहीर केली असून बंदऐवजी एक तासभर राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भूमिका मांडत उद्याचा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. 


राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोध पक्षाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने (Highcourt) म्हटलंय. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भूमिका जाहीर करताना म्हटले की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या (24 ऑगस्ट) राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या निर्णयाविरूद्ध  सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येते, असे ट्विट शरद पवार यांनी बंदबाबत केले आहे. त्यामुळे, उद्याचा बंद मागे घेत असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले. आता, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलतात, त्यांची भूमिका मांडली. 


बंद नाही आंदोलन करणार - उद्धव ठाकरे


न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत. पण, उच्च न्यायालयाने बंदबाबत जितक्या तत्परतेने निर्णय घेतला, तितक्याच तत्परतेने गुन्हेगारांना शिक्षा द्यावी, अशी मागणीपर विनंती उद्धव ठाकरेंनी न्यायालयाकडे केली आहे. तसेच, आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, मी स्वत: सकाळी 11 वाजता शिवसेना भवनातील चौकात काळी फीत बांधून आंदोलनता बसणार आहे. राज्यभरात मविआचे कार्यकर्ते तोंडाला काळी फीत बांधून राज्यभर आंदोलन करतील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, आंदोलन करण्याचा अधिकार राहिला की नाही, असेही ठाकरेंनी म्हटले.  


काय म्हणाले नाना पटोले


महाविकास आघाडी म्हणून उद्याच्या बंदबाबात आमचा निर्णय झाला असून जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार, आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत, तसेच हातात काळे झेंडे आणि हाताला काळी पट्टी लावून उद्या 24 ऑगस्ट रोजी दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत शांततेनं बसून सरकारचा निषेध नोंदवणार आहोत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, शरद पवारांच्या घोषणेनंतर आता काँग्रेसनेही आपली भूमिका जाहीर केली असून महाविकास आघाडीकडून उद्याचा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


काय म्हणाले हायकोर्ट?


राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोध पक्षाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय. जर कोणी बंद केला तर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिलेत. वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आहे.  बदलापुरातील अत्याचारप्रकरणानंतर मविआ आक्रमक झाली आहे. याचाविरोधात उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. 


हेही वाचा


Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप