मुंबई : लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे. या बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी बाजारपेठा कडकडीत बंद आहेत तर काही ठिकाणी बाजारपेठा सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आजचा बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पोलीस दलाचा वापर करत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जबरदस्तीनं व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्यासाठी भाग पाडलं जातंय, असाही आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनावर काँग्रेस नेत्यांकडून मौन व्रत आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या भाजपला आजच्या बंद बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं प्रत्युत्तर काँग्रेस नेत्यांनी दिलंय.
महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. मुंबईत खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादीकडून हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक हे देखील सहभागी झाले होते.
पुणे :
पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केल आहे. टिळक रोडवर बाईक रॅली काढत राष्ट्रवादीने निदर्शनं केले. त्याचबरोबर केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.
नागपूर :
नागपुरातील सक्करदरा चौकात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी वाहतूक रोखण्यात आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडावा असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे त्याचबरोबर पोलीसांकडून त्यांचं काम चोख बजावण्यात येईल असंही वळसे पाटलांनी म्हटलं आहे.
चेंबूर
चेंबूरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर अमर महाल जंक्शन येथे काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या वेळी आंदोलकांनी रस्त्यावर बसून ठिय्या दिल्याचं पाहायला मिळालं. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय. पूर्व द्रुतगती मार्गावर शिवसेनेनं टायर जाळत वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. बूरमधील घाटकोपर-माहुल लिंक रोडवर शिवसैनिक रस्त्यावर उतरले. या ठिकाणी जी दुकाने सुरु होती ती दुकानं शिवसैनिकांनी बंद करायला लावली. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतलंय.
नवी मुंबई
महाविकास आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आज नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील दुकानं, मॉल बंद आहेत. तर नवी मुंबई महापालिकेनं परिवहन सेवाही बंद केली. शहरात बंदला कुठेही हिंसक वळण लागलेलं नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मोर्चे काढून बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन लोकांना केलं.
बोरीवली
मुंबईत बोरीवलीच्या गोराईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाळण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचं दिसतंय. दुकानं, रिक्षा आणि खाजगी गाड्या शिवसैनिक बंद करत आहेत.
कल्याण
कल्याणमध्ये राष्ट्रवादीकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं..