ठाणे : पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आज धडक कारवाई केली. माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एप्रिल-मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर तो संपर्कात होता. एटीएसने चौकशी केल्यानंतर चौघांना अटक केली आहे. गौरव पाटील याला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला हनी ट्रॅप अडकवल्याचा संशय आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातून अटक केलेल्या तरुणाचे नाव गौरव पाटील असे आहे. 23 वर्षीय गौरव पाटील नोवल डॉक येथे कामाला होता. गौरव मागील चार ते पाच महिन्यांपासून पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात होता. त्याने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचेही एटीएसने सांगितलेय. गौरव पाटीलशिवाय अन्य तीन जणांच्याही पाकिस्तानचा गुप्तहेर संपर्कात होता. एटीएसने चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाला गौरव पाटील याच्याबद्दलची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. एक भारतीय संशयीत तरुण हा Pakistan based Intelligence Operative (PIO) यांच्या संपर्कामध्ये आहे. त्याने भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती PIO ला पुरविली आहे.
एटीएसने काय माहिती दिली ?
दहशतवाद विरोधी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत इसमाची चौकशी केली. चौकशी दरम्यान एटीएसला अनेक धक्कादायक माहिती मिळाली. सदर संशयीत व्यक्तीची एप्रिल/मे 2023 ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक व वॉट्सअॅपद्वारे दोन PIO शी ओळख झाली होती. सदर संशयीत इसमाने नमूद PIO शी फेसबुक व वॉटसअॅपवर चॅटींग करुन त्यांना भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनिय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे तसेच नमूद PIO कडून ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी संशयीत इसम व त्याच्या संपर्कातील इतर 3 व्यक्ती अशा एकूण 4 इसमांविरूध्द दहशतवाद विरोधी पथक ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात संशयीत इसमास अटक करण्यात आली असुन दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.