मुंबई: राहुल नार्वेकर हे आमचे जावई आहेत, त्यांनी विधानसभेचे काम करताना सर्वांना न्याय दिला पाहिजे, जावयाने आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही लेकीकडे तक्रार करु अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली. भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर ते बोलत होते.
राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. या नातेसंबंधावर बोट ठेवत जयंत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केलीत्यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "सभागृहाला वळण लावण्याचं काम नव्या अध्यक्षांनी करावं. एखादा भाषण करत असेल तर त्यावेळी विरोधी लोकांकडून बोलू दिलं जात नाही, गोंधळ घातला जातोय. त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळते, त्यामुळे असला प्रकार करू नये".
तुमचा समाचार घेण्याची व्यवस्था करु
जयंत पाटील म्हणाले की, "तुम्ही आमचे जावई आहात. त्यामुळे आमच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन चांगला असेल असं वाटतंय. अन्यथा संध्याकाळी आम्ही आमच्या मुलीला सांगू तुम्ही काय-काय केलंय ते. मग संध्याकाळी तुमचा समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही करु."
फडणवीसांनी ही व्यवस्था केली पाहिजे
जयंत पाटील म्हणाले की, "जावई हे सासऱ्याच्या कुंडलीतील दशम स्थान आहे. आपण आधुनिक काळात आहोत, त्यावेळी हे दशम स्थान कसं चुकीचं आहे हे सांगायची संधी देवेंद्र फडणवीसांना आहे. त्यामुळे किमान एक वर्षभर तरी जावई आणि सासऱ्याचं ही व्यवस्था कायम ठेवण्याची व्यवस्था फडणवीसांनी केली पाहिजे. वरती सासरे कुणावर अन्याय करत नाहीत, आता नार्वेकरही त्यांला न्याय देतील."
महत्त्वाच्या बातम्या: