Maharashtra Assembly Session : आरोप-प्रत्यारोपांनी गाजणाऱ्या विधानसभा सभागृहात आज हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. त्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Marriage) यांच्या लग्नाचा विषय. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी कामगारांच्या लग्नावरुन प्रश्न विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तुम्ही आदित्यजींकडे बघून प्रश्न विचारला का, अशी मिश्किल टिपणी केली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. इतकंच नाही तर सरकार लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणताच, सभागृहात बाकं वाजू लागली. 


देवेंद्र फडणवीस यांच्या टिप्पणीनंतर आदित्य ठाकरे यांनीही मिश्किल टिप्पणी केली. "ही काही राजकीय धमकी आहे का, आधी लग्न लावून देऊ तरच इथे बसा वगैरे."


यावर मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीही चिमटा घेतला. राहुल नार्वेकर म्हणाले की, "आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं." 


तोंड बंद करण्याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न


यावर मग फडणवीसांनी पुढचा टोला लगावला. ते म्हणाले की, "कोणाचंही तोंड कसं बंद करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न, अनुभवातून बोलतोय."


Video : Aaditya Thackeray Marriage: आदित्यच्या लग्नावरुन हास्यकल्लोळ, फडणवीस म्हणाले...



आधी भाकरी-चाकरीवरुन खडाजंगी, मग लग्नावरुन हास्यकल्लोळ


दरम्यान विधानसभेतील या हास्यकल्लोळाआधी भाकरी आणि चाकरी यावरुन जोरदार खडाजंगी झाली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना दादा भुसे यांनी संजय राऊत यांचं ट्वीट सभागृहात वाचून दाखवलं. संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात, असं म्हणातच विरोधी पक्षनेते अजित पवार भडकले. तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण शरद पवार यांचा उल्लेख केला, तो करायला नको होता, असं म्हणत अजित पवार यांनी दादा भुसे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.


दादा भुसे आणि अजित पवार काय म्हणाले?


संजय राऊत यांच्यावर टीका करताना दादा भुसे म्हणाले की, "आम्हाला गद्दार म्हणाले. मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले. त्यांनी ट्वीट केलं, जर त्यात तथ्य असेल तर कारवाई करावी नाहीतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांना जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही."


दादा भुसे यांनी शरद पवार यांचा उल्लेख करताच विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले. "दादा भुसे यांनी आपली भूमिका मांडताना शरद पवार यांचा इथे उल्लेख करणं योग्य नाही. मोदी साहेबही पवार साहेब यांच्या संदर्भात काय बोलतात हे आपल्याला माहित आहे. दादा भुसे तुम्ही तात्काळ माफी मागा, असं अजित पवार म्हणाले. 


संबंधित बातमी