मुंबई: महाविकास आघाडीच्या काळात सत्तेत असूनही शिवसैनिकांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावल्या, त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आता मी मुख्यमंत्री आहे, प्रत्येकाला न्याय देणार असंही ते म्हणाले. विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर ते बोलत होते. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सत्तेचा फायदा हा तळागाळातल्या शिवसैनिकाला झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री पक्षाचा असताना जर शिवसैनिकाला उभं करायचं नाही तर कधी करायचं असा सवाल होतं. पण सत्तेत असलेल्या शिवसैनिकाला काय मिळालं? शिवसैनिकाला सत्तेचा फायदा कुठे मिळाला? शिवसैनिकांना सत्तेत असूनही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावल्या."


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "जयंत पाटील ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणचा आमदार हा राष्ट्रवादीचा असणार असं म्हणायचे. अनेक ठिकाणच्या शिवसैनिकांना धमक्या दिल्या जायच्या, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जायचं. त्यावेळी राष्ट्रवादीत या मग गुन्हे मागे घेऊ असा दम दिला जायचा. त्यावेळी त्या ठिकाणचा शिवसेनेचा आमदार बिथरायचा, कार्यकर्ते बिथरायचे. ते माझ्याकडे यायचे आणि व्यथा मांडायचे. त्यावेळी मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करायचो." 


आता शिवसैनिकांना हक्काचा माणूस मिळाला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची कामं होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेससोबत जाणार नाही. ज्या दिवशी मी काँग्रेस सोबत जाईन त्या दिवशीच राजकारणाचं हे दुकान बंद करेन असं बाळासाहेब म्हणाल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.