मुंबई: अजित पवार हे एकदम शिस्तप्रिय आणि वक्तशीरपणा पाळणारे, त्यांनी एकदा का शब्द दिला की तो ते पाळणारच अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केलं. अजित पवार आणि आपली जन्मतारीख एकच असून ते माझ्या 72 तासांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि मित्र आहेत असंही उपमुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.


पवार साहेबांच्या नंतर त्यांच्या घराण्यातील सर्वात मान्यवर व्यक्तीमत्व म्हणून अजित पवार यांचेकडे पाहिलं जातं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ते म्हणाले की, "राज्याला विरोधी पक्षनेत्यांची मोठा इतिहास आहे. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे नाव घ्यायला हवं. आता अजित पवारांना ती संधी मिळाली आहे. अजितदादांची राजकारणातील प्रेमळ दादागिरी अनेकदा अनुभवायला मिळाला. अनेक तरुणांना अजित दादांची स्टाईल आवडते. कधीकधी त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आले पण नंतर त्यांनी ते सुधारलं."


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अजितदादा आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजे चार वेळा उपमुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रीपदाने त्यांना सातत्याने हुलकावणी दिली. अजित दादांनी एकदा का शब्द दिला की ते पाळतात हे त्यांचे विशेष. दादा अत्यंत अतिशय शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील."


अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीची आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली. ते म्हणाले की, अजितदादा हे माझ्या 72 तासांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि मित्र आहेत. आज राष्ट्रवादीवाल्यांना वाटत असेल की तेच बरोबर होतं.


अजित पवार यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे अभिनंदन केलं. अजित पवार हे यांच्यासोबत आपण काम केलं आहे. त्यांच्या कार्यशैलीचा अनुभव आपल्याला असल्याचं ते म्हणाले.